दादरच्या नव्या देखण्या ‘सिटीलाइट’ चित्रघरात गुरुवार, १२ जूनपासून नव्या-जुन्या मराठी चित्रपटांचा महोत्सव आयोजित केला आहे. चित्रघरातर्फे संपन्न होणारा हा पहिला मराठी चित्रपट मेळावा आहे. त्या निमित्ताने दादरमधल्या चित्रघरांच्या गतस्मरणांना उजाळा.
साठ-सत्तर वर्षांपूर्वीचं दादर. तेव्हा ‘कोहिनूर’ आणि ‘प्लाझा’ ही दोन चित्रघरं दादरची अभिमान स्थाने होती. कान्हेरेंच्या ‘कोहिनूर’च्या बाहेर उंचावर केलेल्या डेकोरेशनवर नजर टाकल्याशिवाय स्टेशनातून बाहेर पडलेल्याला किंवा स्टेशनाकडे जाणाऱ्याला गत्यंतरच नसायचं. कोहिनूरला नेहमी भाविक, सोज्वळ, पौराणिक चित्रपट लागायचे. त्यामुळे डेकोरेशन बघून पांथस्थांना आपोआपच देवदर्शन घडायचं. चालताबघता पुण्य लाभायचं.
एकदा मुसळधार पावसात दादरच्या झाडांची तोडमोड झाली, पण तो पाऊसवारा कोहिनूरच्या डेकोरेशनमधल्या देवाला आणि भक्ताला काहीच करू शकला नाही. दुसऱ्या दिवसापासून त्या देवाला दादरकरांचे नारळ मिळायला लागले.
कोहिनूरला दर्शनी दोन दरवाजे होते. एका दरवाजाने दहा पावलं आत गेलं की ‘स्टॉल’चा दरवाजा. दुसऱ्या दरवाजानं पुढं गेलं की खालच्या दराच्या तिकिटाचे दरवाजे. मध्ये एक छोटीशी बाग.
प्रेक्षागृहाच्या बाहेरच्या भिंतीवर चित्रपटातील दृश्यांची छायाचित्रे काचपेटीत लावलेली असायची. तिकीट काढून आत आल्यावर प्रेक्षागृहाचे दरवाजे उघडेपर्यंत प्रेक्षक ती छायाचित्रे उत्सुकतेने बघत उघडणाऱ्या दरवाजाची वाट बघत उभे राहायचे. प्रेक्षागृहात जाण्याचा लोखंडी जाळीचा दरवाजा उघडणं आणि त्यातून आत घुसणं म्हणजे एक थरारक अनुभव असायचा.
दुसरी घंटा झाली की लोखंडी दरवाजा धडधड आवाज काही सेकंदभर करीत राहायचा आणि धडाम्दिशी उघडायचा. प्रेक्षकांची झुंबड आत घुसायची. चार आण्यांच्या बाकावर जागा पकडण्यासाठी धावपळ व्हायची. बाकावरची प्रत्येक आसनाची विभागणी दोन्ही बाजूंच्या वाकवलेल्या गजांनी व्हायची. याच गजावर हात ठेवून चार आणेवाल्यांनी सिनेमा बघायचा. मध्यभागी असलेल्या पडद्याच्या बाजूच्या दोन्ही भिंतींवर सरस्वती व लक्ष्मीदेवीची पेंटिंग्स होती.
चित्रपट सुरू व्हायच्या वेळी छताजवळ असलेले शटर्स (झडपं) खालून दोरीनं ओढून सटासट आवाज करीत बंद व्हायची. प्रेक्षागृहात थोडा काळोख यायचा. मग दरवाजावरचे निळे पडदे खसाखस आवाज करीत ओढले जायचे. काळोखात थोडी भर पडायची. छताला लागलेल्या पंख्याची पिरपिर जाणवायची. मध्यंतरात थंड सोडा लेमन विकणारे बाटल्यांवर आवाज करीत फिरायचे.
कोहिनूरचा सिनेमा सुटला की प्रेक्षक भलत्याच वाटेनं बाहेर पडायचे. ‘छाया’ हॉटेलच्या बाजूनेच ते बाजाराच्या रस्त्यावर यायचे. तिथे ‘गाना चोपडी’ ‘गाना चोपडी’ असा पुकारा करीत चित्रपटातील गाण्यांची पुस्तिका विकणाऱ्यांची गडबड असायची.
पौराणिक किंवा ग्रामीण चित्रपट दाखवणारे ‘कोहिनूर’ खरं उसळलं ते दादा कोंडके यांचा  पहिला चित्रपट ‘सोंगाडय़ा’ लागला तेव्हा. तेव्हा ‘कोहिनूर’ने आणि सोंगाडय़ानं खळबळ माजवली.
आज दादरमधल्या त्या ‘कोहिनूर’चं ‘नक्षत्र’ झालंय. पण बाजारमॉलच्या या ‘नक्षत्रा’त कोहिनूरची आत्मीयता दादरकरांना कुठेच आढळत नाही. ‘कोहिनूर’वर ‘नक्षत्र’ पडलं हेच खरं!
‘प्लाझा’ चित्रपटगृह हे जरा सुप्रतिष्ठित मानलं जायचं. चित्रकर्त्यांना आपला चित्रपट प्लाझात प्रदर्शित करण्यात भूषण वाटायचं. पौराणिक चित्रपटाऐवजी सामाजिक मध्यमवर्गीयांचं चित्रण करणाऱ्या चित्रपटांना येथे अग्रक्रम मिळायचा.
या चित्रपटगृहाला खास चित्रपटीय वारसा होता. ते शांतारामबापूंचं असल्याचं सर्वाना ठाऊक होतं. त्या वेळचं दादरमधलं ते चकाचक थिएटर होतं. प्लाझाचं प्रवेशद्वार छोटय़ाशा मंडपीत होतं. डेकोरेशन तिथं मंडपीवर पहिल्या मजल्याच्या उंचीवर उभं केलं जायचं.
खाली तिकीट बाऱ्या होत्या. त्यातील एक बाल्कनीसाठी व दुसरी अ‍ॅडवान्स बुकिंगसाठी असायची. बाजूला एका छोटय़ाशा दरवाजातून आत एक बोळ होता. तो वळण घेऊन दुसऱ्या टोकाला प्रेक्षागृहाच्या कॉरिडॉरमध्ये यायचा. खालच्या दराची तिकिटे काढणाऱ्या प्रेक्षकांच्या रांगेला उन्हाचा त्रास होऊ नये आणि रांगेत घुसणे होऊ नये म्हणून ही खास व्यवस्था. मुख्य दरवाजाच्या बाजूला भिंतीवर ‘मॉर्निग शो’चा बोर्ड असायचा. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर ऐसपैस जागेच्या शेवटी एक उघडझाप करणाऱ्या अध्र्या दरवाजाची केबिन होती. त्या केबिनच्या वर शांतारामबापूंच्या छायाचित्राची फ्रेम कायम असल्यामुळे आत तेच वावरत असल्याचा भास व्हायचा आणि बाल्कनीच्या जिन्याकडे जाणारा माणूस जरा दबकतच ही केबिन ओलांडून पुढे जायचा. प्लाझा प्रेक्षकगृहाचा बाहेरचा परिसरच एकूण मोकळाढाकळा असायचा. प्लाझाचं ते अंगण एखाद्या फिल्म स्टुडिओतच आल्यासारखं वाटायचं. रात्रीच्या शोला प्लाझाच्या प्रेक्षागृहाच्या मागच्या बाजूचे दरवाजे सताड उघडे ठेवायचे. मोकळी हवा खेळायची. या सुशितलपणाचा फायदा आम्ही शाळा-कॉलेजातली फुकटी मुलं घ्यायचो. मागच्या दरवाजाच्या पायऱ्यांवर बसून अमरभूपाळी, रामजोशी या चित्रपटातली गाणी ऐकत बसणे हा त्या वेळचा आमचा छंद होता. टिळक ब्रिजवरून आम्ही चालत आलो आणि मध्येच पाऊस आला की आसऱ्यासाठी प्लाझाच्या मंडपीखाली यायचो.
प्लाझाची अजूनही स्मरणात असलेली आठवण म्हणजे प्लाझा चित्रपटगृह काही दिवसांपुरतं नाटय़गृह झालं त्या वेळची. शांतारामबापूंनी ‘रंगमंदिर’ या आपल्या नाटय़संस्थेतर्फे कै. वासुदेवशास्त्री खरे यांचं जुनं ऐतिहासिक नाटक ‘शिवसंभव’ पुन्हा नव्याने मोठ्ठय़ा थाटामाटात रंगमंचावर आणलं (१९५९.) नेत्रदीपक नेपथ्य, उंची भरजरी पोषाख, बाबुराव पेंढारकर, वत्सला देशमुख, प्रभाकर मुजुमदार, माई भिडे इ. दिग्गज कलावंत आणि दिग्दर्शक होते. नटवर्य केशवराव दाते. संगीत होते वसंत प्रभू यांचे. या प्रयोगाने त्या वेळच्या नाटय़विश्वात प्रचंड हवा निर्माण केली होती. प्लाझा चित्रपटगृहात आठ दिवसांसाठी चित्रपट दाखविणं बंद केलं होतं. दररोज रात्री एक खेळ ‘शिवसंभव’चा ठेवला होता. एकाच कंपनीचं एकच नाटक सतत आठवडाभर एकाच नाटय़गृहात ही घटनाच सनसनाटी होती. आगाऊ तिकीट विक्रीला लागलेली रांग प्लाझापासून थेट टिळक ब्रिज संपून हिंदू कॉलनीच्या गल्लीत घुसली होती. माझ्या आठवणीतलं प्लाझा हे असं चित्रपटाला आणि नाटकालाही जवळ करणारं सांस्कृतिक केंद्र होतं. ‘सिटीलाइट’ थिएटरची एक वेगळीच गंमत होती. ते धड दादरमध्ये नव्हतं की माहीममध्ये; पण माटुंग्याची ‘सिटीलाइट’ असं कुणी म्हणायचेच नाहीत. लोकांनी बरीच वर्षे सिटीलाइटला माहीममध्येच ढकलून दिलं होतं. बहुधा तिथं मराठी चित्रपट लागत नसत म्हणून असं झालं असावं. सिटीलाइटच्या समोर नवं मार्केट आलं आणि ते आपोआप दादरमध्येच आलं. सिटीलाइटचं अंगण मोठं छान होतं. डाव्या बाजूला असलेल्या पुरुषभर होर्डिगवर आगामी चित्रपटाचं पोस्टर असायचं. लांबच लांब तीन पायऱ्या, खालच्या बाजूला उजव्या हाताला काटकोनात दोन सीमेंटच्याच तिकीटबाऱ्या. कॅप्टन माखलच्या २५ चॅप्टरच्या सीरिअल्स आम्ही चार आणे तिकिटात तिकडे बघायचो. घरी विचारलं तर फायटिंगच्या सिनेमाला गेलो होतो, असं सांगायचो. तिथे होमी वाडियाचे पण चित्रपट लागायचे, पण अधिक भरणा होता तो हिंदी फिल्मिस्तानच्या पिक्चर्सचा. राज कपूरचे चित्रपटही येथे ठाण मांडायचे. पण येथे चित्रपट एक-दोन आठवडय़ांत बदलत असायचे. त्यामुळे हिंदी चित्रपटशौकिनांचा सतत राबता असायचा. सगळे खेळ फुल्ल असायचे. हे मारामारीचे इंग्रजी चित्रपट मॅटिनी शोज्मध्ये दाखवले जायचे.
सिटीलाइटची विसरता न येण्याजोगी आठवण म्हणजे सिटीलाइटच्या बाहेर भजी तळत बसलेला भजीवाला. फक्त त्याच्याकडेच मूगडाळीची भजी मिळायची. सिटीलाइटचं पिक्चर कसंही असो आणि आतली बसायची व्यवस्थाही जेमतेमच असो. पण बाहेरची मूगडाळीची भजी खाल्ल्यानंतर जे काही पाहिलं, अनुभवलं ते सारं बरंच वाटायचं. टुकार पिक्चरवर खमंग भज्यांचा उतारा केव्हाही चांगलाच. पूर्वीच्या चित्रपटगृहांना स्वत:चं असं एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होतं. आयडेंटिटी होती. प्रेक्षक ‘थिएटर’ला जायचो म्हणायचे. घरून निघाल्यापासूनच त्या विशिष्ट थिएटरचं वातावरण निर्माण व्हायचं. आताची मल्टिप्लेक्स सुंदर आलिशान. पण सगळ्या सुंदऱ्या एका छापाच्या नवरात्रातल्या सजवलेल्या देवीसारख्या. तोच काळोख, तसाच काळोख. तशीच गुबगुबीत बसायची व्यवस्था. कुठच्या थिएटरला आलो, हे लक्षात येणं आणि लक्षात राहणं मुष्कील. मग नाव घ्यावं लागतं ते त्या सिनेमाचंच.
ते सिनेमे गेले आणि ती चित्रघरंही गेली. आता देखणेपणात पडद्यावरच्या सिनेमाचा अनुभव फिकट झाला.