News Flash

‘कथेमागचा दृष्टिकोन महत्त्वाचा’

दिग्दर्शित निपुण धर्माधिकारीचा ‘धप्पा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या विषयाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.

(संग्रहित छायाचित्र)

दिग्दर्शित निपुण धर्माधिकारीचा ‘धप्पा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या विषयाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. याआधीही विविध चित्रपट महोत्सवांमधून हा चित्रपट झळकला होता. साध्या सोप्या गोष्टीतून उलगडणाऱ्या या चित्रपटाचं यश नेमकं कशात आहे, हे जाणून घेण्यासाठी आणि भाडीपचा लोकमंच कसा असणार आहे, याविषयी अभिनेता, दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी याच्याशी संवाद साधला.

‘धप्पा’ या चित्रपटाची कथा गिरीश कुलकर्णीची आहे. ही पुण्यातल्या एका सोसायटीत घडलेली घटना होती. त्या सोसायटीमध्ये लहान मुलांचं नाटक त्याच्या विषयामुळे बंद पाडलं होतं. या घटनेचा धागा घेऊन त्यानंतर गिरीशने त्याची कथा आणि पटकथा लिहिली. पण याचं दिग्दर्शन मी करावं हे आपसूकच माझ्याकडे चालून आलं. मी दिग्दर्शित केलेल्या एका नाटकात गिरीशदादाने काम केलं होतं. मी जेव्हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार करतोय, हे गिरीश दादाला कळलं तेव्हा त्याने धप्पाची कथा ऐकवली, असं निपुण म्हणाला.

विषयाची निवड करण्यामागचं कारण सांगताना तो म्हणाला, नीतिमूल्यं, धार्मिक अढी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा हे फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. सध्याचं वातावरणही तसंच आहे. पण एकूणच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलू पाहणारा हा चित्रपट आहे. हा महत्त्वाचा विषय आहे, कारण अजूनही आपल्याकडे लोकांना माहीत नाही, की आपण काय बोलू शकतो, असं निपुण सांगतो.

हा चित्रपट करताना ठरावीक प्रेक्षकवर्गाचा विचार करून नव्हे, तर चांगली गोष्ट मांडली जाणं आवश्यक होतं, हा विचार त्यामागे होता. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चित्रपट येतोय, म्हटल्यावर आपलीही गळचेपी होईल की काय, पण हे धाडस करून पाहूच असं ठरवलं. असं त्याने सांगितलं.

आपल्या दिग्दर्शनाविषयी तो म्हणाला की, दिग्दर्शक म्हणून हा त्याचा पहिला चित्रपट आहे. पण हा ‘बापजन्म’ चित्रपटानंतर प्रदर्शित होत असल्यामुळे दुसरा चित्रपट आहे. मुळात कथा सांगायला आवडत असल्यामुळे त्यासाठी आता वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत, ही चांगली गोष्ट आहे. असं निपुण सांगतो.

हे वर्ष निवडणुकांचं असल्यामुळे मनोरंजनाच्या माध्यमातून राजकारण रंगू लागलं आहे. असे चित्रपट प्रचारकी असतात की, असतील तर त्याने फरक पडतो का, असं विचारल्यावर निपुण म्हणतो, असे चित्रपट बनवण्यामागे दृष्टिकोन काय आहे, हे महत्त्वाचं आहे. चित्रपट बनवण्यामागचा दृष्टिकोन जर कथा सांगणं असेल तर तो चित्रपट प्रभावी होतो. चित्रपट करण्याचा उद्देश पक्षाचा उदोउदो करण्याचा किंवा हा पक्ष वाईट आहे, असा असेल तर मग गडबड आहे. असं माझं मत आहे. सजग प्रेक्षकांनाही त्यामागचा उद्देश कळतो. उदाहरण द्यायचं झालं तर ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट यशस्वी झाला नाही, ‘उरी : द सर्जिकल स्टाईक’ हा चित्रपट यशस्वी झाला. कारण उरी : द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटामागचा उद्देश हा कथा सांगणे होता, त्यामुळे प्रेक्षकांना आवडला.

भाडीपचं ‘विषय खोल’ नावाचं दुसरं यू-टय़ुब चॅनल येतंय. त्यावरील ‘लोकमंच’ या कार्यक्रमाविषयी विचारल्यावर निपुण म्हणाला की शंभर टक्के निवडणुकीचा काळ लक्षात घेऊनच हा कार्यक्रम सुरू केला आहे. पण उद्देश लोकप्रबोधन हा आहे. आपले नेते जाणून घेणे ही मध्यवर्ती संकल्पना आहे. कुठल्याही पक्षाला आम्ही पाठिंबा देत नाही. सगळ्या पक्षातील नेत्यांना लोकांसमोर आणणार आहोत. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना नेते जाणून घेता येतील. आजची तरुण पिढी राजकारणाविषयी, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबाबत सजग आहे. फक्त झालंय असं की त्यांच्यावर सतत माहितीचा भडिमार होतोय. तरुण पिढीने फेक न्यूजला बळी पडू नये असं वाटतं. त्यांनी काळजी घेतली पाहिजे, असं निपुण म्हणाला.

ऑनलाइन माध्यमांवर सेन्सॉरशिप आणण्याचा मुद्दा वारंवार चर्चिला जातो, त्याविषयी मनोरंजन क्षेत्रातील तरुण पिढीचा सजग प्रतिनिधी म्हणून मत मांडताना निपुण म्हणाला, कुठल्याही माध्यमावर सेन्सॉरशिप नसावी, असं त्याचं मत आहे. प्रेक्षक सजग आहेत. त्यांना अचूक कळतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 12:51 am

Web Title: story point of view is important says nipun dharmadhikari
Next Stories
1 गाण्याचं नाव..
2 ‘सोयरे सकळ’ : घनगर्द अरण्यात.. मूळांच्या शोधात!
3 चित्रचाहूल : अद्भुत सफर
Just Now!
X