करोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी सरकारने येत्या ३ मे पर्यंत लॉकडाउन जारी केला आहे. लॉकडाउनच्या काळात घरात बसून वैतागलेल्या लोकांच्या मनोरंजनासाठी आता एक नवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हा उपक्रम ‘ठाणे आर्ट गिल्ड’ आणि ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या सहकार्याने बारोमास टीमने सुरु केला आहे. ‘२१ दुणे ४२’ असं या उपक्रमाचं नाव असून या अंतर्गत अभिनेता सुमित राघवन प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी मेजवानी घेऊन आला आहे. सुमितने लेखिका डॉ. भारती सुदामे यांच्या ‘कबीरायन’ या पुस्तकातील संत कबीरदास यांची एक कथा वाचून दाखवली आहे.

दरम्यान, लॉकडाउनच्या दिवसात प्रत्येक जण घरात राहून आता कंटाळला आहे. त्यातच काही जण त्यांचे छंद जोपासत आहे. काही जण कुटुंबासाठी वेळ देत आहेत. मात्र तरी देखील करोनामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरण पसरलं आहे. त्यामुळेच या नकारात्मक वातावरणावर मात करत त्यात सकारात्मकता आणण्यासाठी ‘ठाणे आर्ट गिल्ड’ (टॅग) प्रस्तुत, सदानंद देशमुख यांच्या कादंबरीवर आधारित ‘बारोमास’ या नाटकाची टीम पुढे सरसावली आहे. वेगवेगळ्या कथावाचनाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.