काळ बदलला तशी माणसाची मूल्यंही बदलली. प्रवृत्ती अन् मानसिकताही बदलत गेली. आज ‘बांधीलकी’ हा शब्द कालबाह्य़ झाला आहे. निष्ठा फक्त स्वार्थाशीच उरली आहे. तत्त्वं वगैरे गोष्टींना तर आता बाजारात किंमतच नाही. मानवी नातीही याला अपवाद नाहीत. मात्र, हे उघडपणे मान्य करेल तर तो माणूस कसला? आपल्या वागण्याची वकिली करताना तो नाना समर्थनं देतो. वरकरणी ती पटतीलशी असतातही; परंतु खोलात जाऊन विचार केल्यास त्यातलं वैय्यथ्र्य लगेचच ध्यानात येतं. दत्ता पाटील लिखित आणि अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटक याचं वानगीदाखल उदाहरण ठरावं.

अमित-जान्हवी या जोडप्याच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत त्यांच्यातल्या नात्याची चिकित्सा ‘स्ट्रॉबेरी’त करण्यात आली आहे. आनंदी, सुखी भासणाऱ्या या जोडप्याचं व्यक्तिगत जीवन एकमेकांशी खरंच एकरूप झालं आहे का, हा प्रश्न यानिमित्तानं ऐरणीवर येतो. त्याचं उत्तर नाटकाअखेरीस होकारात्मक मिळत असलं तरी त्याआधी घडणाऱ्या घटनांतून मात्र ते प्रत्ययाला येत नाही.

जान्हवी लग्नाआधी रविप्रकाश या तरुण कवीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आजही ती त्याच्या कवितांना त्याच असोशीनं दाद देते. ती स्वत:ही कवयित्री आहे. अमितला तिच्याच नव्हे, तर एकूणच कविताबिवितांमध्ये रस नाही. त्यात त्याला गम्यही नाही. प्रथमदर्शनीच जान्हवीच्या प्रेमात पडून त्यानं ‘झट मंगनी पट ब्याह’ करून तिला आपल्या आयुष्याची जोडीदारीण बनवलेलं असतं. रवीच्या प्रेमात बुडालेली असूनही जान्हवी अमितशी लग्नाला राजी होते आणि त्यांचं लग्न होतं. जान्हवीच्या या विश्वासघातामुळे कमालीचा दुखावलेला आणि हा धक्का सहन न झाल्यानं विव्हल झालेला रवी तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तिला जाब विचारायला तिच्या घरी येतो. अमित तेव्हा बाजारात गेलेला असतो. रवीच्या बोचऱ्या, संतप्त प्रश्नांना जान्हवी थेटपणानं काहीच उत्तर देत नाही. मात्र, आपण जे काही केलं ते योग्यच होतं, असं तिचं  म्हणणं असतं.  माझं लग्न झालेलं असलं तरी अद्याप मी तुझ्या कवितांवर पूर्वीइतकंच मनापासून प्रेम करते, असं ती रवीला सांगते. तिची ही मखलाशी रवीला पटत नाही. निव्वळ व्यावहारिक विचार करून तिनं अमितशी लग्न केल्याचा आरोप तो करतो. ती तो साफ अमान्य करते. अजूनही मी तुझी वाट पाहतोय, असं तो तिला सांगतो. जान्हवीही अजून त्याच्या प्रेमात असल्याचं तिच्या वर्तनातून जाणवत असलं तरीही अमितशी लग्न करण्याचा आपला निर्णय चुकीचा नव्हता, असंच तिचं म्हणणं असतं.

रवी तिला तिच्या या दुटप्पीपणाबद्दल चांगलंच फैलावर घेतो. ती मात्र ठाम शांतपणे त्याचा तो उद्रेक सहन करते. त्याला समजावण्यात अर्थ नाही हे तिच्या ध्यानात येतं.

एव्हाना जान्हवीच्या घरातील एकंदर चित्रावरून रवीला आपलं तिथलं उपरेपण आणि तिच्या आयुष्यातून आपण बेदखल झालोय हे कळून येतं. पण त्याचं मन मात्र हे मानायला तयार नसतं. तो पुन: पुन्हा तिचं मन जाणून घेऊ पाहतो. पण व्यर्थ!

..अशात अचानक निलम नावाची तरुणी त्यांच्या संभाषणात व्यत्यय आणत जान्हवीच्या घरात घुसते. आपण अमितची प्रेयसी असल्याचं सांगून, त्यानं आपल्याला का झिडकारलं याचा जाब विचारण्यासाठी आपण आल्याचं ती सांगते. आपल्यासाठी पागल झालेल्या अमितनं आपलं प्रेम लाथाडून मागचा पुढचा कसलाही विचार न करता जान्हवीशी अकस्मात लग्न केल्यानं ती सैरभैर झालेली असते. आणि त्याचाच जाब विचारण्यासाठी ती आलेली असते.

या अनपेक्षित प्रसंगानं रवी आणि जान्हवी दोघंही दिग्मूढ होतात. जान्हवी तर आधी तिचं सगळं म्हणणंच उडवून लावू पाहते. निलमची बाजू घेऊन रवीही अमितला (अन् आडवळणानं तिलाही!) फसवणुकीच्या आरोपात पिंजऱ्यात उभं करतो तेव्हा जान्हवी चिडते. ‘मला अमितच्या पूर्वायुष्याशी काही देणंघेणं नाही. आज तो माझा नवरा आहे एवढंच माझ्या लेखी वास्तव आहे,’ असा ती त्याचा बचाव करते. एवढंच नाही, तर निलमला जाणीव करून देते की, अमित आणि निलमचे संबंध कितीही पुढे गेलेले असले तरी त्यात कसली बांधीलकी नव्हती. ती त्या दोघांची तत्कालीन निकड होती आणि परस्परांच्या सहमतीनं त्यांनी ती भागवली. त्यात लग्नाचं आश्वासन कुठंच नव्हतं. त्याचवेळी ती रवीलाही सुनावते की, ‘माझं तुझ्यावर कितीही प्रेम असलं तरी ‘नवरा’ म्हणून मी तुझ्याकडे कधीच पाहू शकले नाही. ते ‘मटेरिअल’ अमितमध्ये मला आढळलं आणि मी त्याच्याशी लग्न केलं. यात माझं काही चुकलंय असं मला बिलकूल वाटत नाही. प्रेम आणि लग्न या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्यांच्या मागण्या वेगवेगळ्या आहेत. हे तू समजून घे.’ रवीला (आणि निलमलाही!) आपल्या सवालांची उत्तरं मिळतात, आणि दोघंही निघून जातात.

उरतो प्रश्न अमितचा! त्यानं लग्नापूर्वी जान्हवीला आपल्या प्रेमप्रकरणाची कल्पना का दिली नाही? आणि तिनं तरी रवीवरील आपल्या प्रेमाची कल्पना त्याला कुठं दिली होती? ती दोघं एकमेकांसमोर येतात तेव्हा काय घडतं..? या प्रश्नांची उत्तरं नाटकात शोधणंच उचित होय.

लेखक दत्ता पाटील यांचं हे नाटक स्ट्रॉबेरीच्या स्वादाचं, आंबट-गोड, काहीसं तुरट आणि ‘पाणी’दार असल्यानंच त्यांनी हे शीर्षक दिलं असावं. प्रेम-संकल्पनेवर ते आधारित आहेच; मात्र त्याचा जीव अगदीच स्वल्प आहे. लेखकाला यात जे मांडायचंय, ते एकांकिकेमध्येही तो मांडू शकला असता. ‘पाऊस कितीही आवडत असला तरी त्याला घरात थारा नसतो!’ या आशयसूत्राभोवती रचलेलं हे नाटक. दोन अंकी, तीन प्रवेशी. त्यातही शेवटचा प्रवेश अगदीच छोटा. पहिला संपूर्ण अंक रवीने जान्हवीला जाब विचारण्यातच खर्ची पडला आहे. बरं, मनोविश्लेषणाच्या अंगानंही त्यात फारसं काही हाती लागत नाही. अंक संपता संपता निलमच्या एन्ट्रीने थोडीशी खळबळ माजते, तितकीच. अन्यथा सबंध अंक फिरून फिरून तिथंच घुटमळत राहतो. मधे विरंगुळा म्हणून शेजारच्या शारदाकाकू येतात खऱ्या; पण या पात्राचं प्रयोजन काय, हे कळत नाही. असली कृत्रिम पात्रं सत्तरच्या दशकातील मेलोड्रॅमॅटिक नाटकांतून हटकून दिसत. दुसऱ्या अंकात नाटक काहीसं नाटय़ात्म वळण घेतं. परंतु मूळ बीजातच दम नसल्याने ते फुलवून फुलवून कितीसं फुलणार? त्यामुळे नको इतकं ताणलेलं हे दळण कधी संपणार, असंच वाटत राहतं.

दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी आशय-विषयात फारसा दम नसलेल्या या नाटकात आपल्या हाताळणीनं काही अंशी फ्रेशनेस आणण्याचा यत्न केला आहे. प्रयोगाची रोमॅंटिक पद्धतीनं हाताळणी करताना जान्हवी आणि रवीमधली भावनिक दरी, त्यांचे प्रेमासंबंधीचे भिन्न दृष्टिकोन आणि त्यातून रवीच्या वाटय़ाला आलेली दारुण निराशा, वैफल्य आणि संताप, त्या साचलेपणातून झालेला रवीचा उद्रेक झेलताना जान्हवीची होणारी कुंठितावस्था अभिजीत झुंजारराव यांनी कौशल्यानं अधोरेखित केली आहे. अमितचं ‘हॅपी गो लकी’ असणं आणि निलमचं उठवळ उच्छृंखलपण त्यांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांनी नेमकेपणी पोहोचेल असं पाहिलं आहे. तथापि, नाटकात अधूनमधून जाणवणारी कृतकता कलाकारांच्या भूमिकेशी पूर्णाशाने एकरूप न होण्याने खटकत राहते. एकांकिकेचा विषय पूर्ण लांबीच्या नाटकात ताणण्याचा प्रयत्न केल्यामुळेच हा दोष आला आहे. व्यावसायिक रंगभूमीवरचं दिग्दर्शकाचं हे पहिलं नाटक असलं तरी संहितानिवडीची चूक वगळता त्यांनी प्रयोगात प्राण फुंकण्याचे निश्चित प्रयत्न केले आहेत. अर्थात ते तोकडे पडलेत, ही गोष्ट अलाहिदा.

प्रसाद वालावलकरांचं नेपथ्य बटबटीत व ढोबळ आहे. साई-पियुष यांनी पाश्र्वसंगीतातून नाटय़ांतर्गत मूड्स गहिरे केले आहेत. भूषण देसाईंची प्रकाशयोजना नाटकाची निकड पुरवते. वेशभूषाकार ऋजुता चव्हाण यांनी शेवटच्या प्रसंगात अमितला दिलेला ‘मि. क्लेव्हर’ अक्षरांचा टी-शर्ट अर्थपूर्ण वाटतो.

सुयश टिळक यांनी जान्हवीच्या विश्वासघाताने खोलवर दुखावलेला, इगोला प्रचंड ठेच पोचलेला आणि या धक्क्य़ाचा शक्य तितका संयत उद्रेक करू बघणाऱ्या प्रियकराच्या (रवीच्या) भूमिकेत संवादफेकीतील विरामांच्या जागांसह जान ओतली आहे. जान्हवीला जाब विचारताना रवीचं फिरून फिरून पुन्हा त्याच समेवर येणं, तिच्या शेवटच्या स्पष्टीकरणानं शांतवणं आणि वस्तुस्थितीचा व्यथित अंत:करणानं स्वीकार करणं- हे सारं वास्तवदर्शीपणे अभिव्यक्त केलं आहे. जान्हवी झालेल्या सुरुचि आडारकर यांना संहितेकडूनच पुरेसं पाठबळ न मिळाल्यानं तोकडय़ा पडल्या आहेत. तशात रंगमंचावरचं त्यांचं नवखेपणही जाणवत राहतं. डॉ. निखिल राजेशिर्के यांनी अमितचं खुशालचेंडू व्यक्तित्व सफाईनं आत्मसात केलं आहे. त्यांच्या अवघ्या अस्तित्वातून ते व्यक्त होतं. केतकी विलास यांनी निलमचा उच्छंृखलपणा यथार्थपणे दाखवला आहे. संवादफेक आणि अतिरेकी देहबोलीतून तिचं उठवळपण प्रतीत होतं. शारदा हे पात्रच मुळी नाटकात अप्रस्तुत असल्यानं त्याचं चाकोरीबद्ध रूप साकारणाऱ्या अनिता कुलकर्णी यांना दोष देण्यात काही अर्थ नाही.