भयपट आणि विनोदी चित्रपट ही दोन टोके एकत्र आणत प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणजे ‘स्त्री’. भयपटाची साचेबद्ध मांडणी न करता त्यात परिस्थितीनुसार विनोदाची फोडणी देत दिग्दर्शक अमर कौशिक याने ‘स्त्री’ रंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणला आणि हा प्रयत्न यशस्वीसुद्धा ठरला. तिसऱ्या आठवड्याअखेर या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ‘स्त्री’च्या कमाईबाबत माहिती दिली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने १०१.४३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या वर्षात १०० कोटींचा टप्पा पार करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘स्त्री’ नवव्या स्थानावर आहे. ‘स्त्री’ व ‘यमला पगला दिवाना फिर से’ हे दोन चित्रपट एकत्र प्रदर्शित झाले होते. या स्पर्धेत ‘स्त्री’ने अनपेक्षितपणे यश मिळवले असून प्रेक्षक- समीक्षकांकडून चित्रपटाला चांगलीच दाद मिळत आहे.

‘स्त्री’ या चित्रपटात भय आणि विनोदाचे अफलातून मिश्रण करतानाच नावाप्रमाणेच स्त्रीभोवती असलेल्या अनेक जुनाट कल्पना, बुरसटलेला दृष्टिकोन याचाही समाचार दिग्दर्शकाने घेतला आहे. स्त्री कोण असते, तिच्यामुळे गावात काय गोंधळ होतो, गाव स्त्रीच्या कचाटय़ातून बाहेर येते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यातून मिळतात. राजकुमार राव, अपारशक्ती खुराणा, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी या चौकडीने आपल्या विनोदाच्या टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तर श्रद्धा कपूरनेही चांगली कामगिरी आहे.