12 December 2017

News Flash

गोष्ट खऱ्या ‘मित्रा’ची

वाचनाला आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान आहे.

श्रीराम ओक | Updated: February 12, 2017 1:00 AM

वाचनाला आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक महत्त्वाचे स्थान आहे. शालेय जीवनापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण वाचत असतो. आधी शिक्षण घेण्याच्या उद्देशाने तर नंतर छंद म्हणून आपल्याला जे आवडेल ते प्रत्येक जण वाचतच असतो. वाचण्यासाठी स्थळ, काळाचे असे विशिष्ट बंधन नसते. बदलत्या माध्यमांमुळे आपले वाचनाचे माध्यम बदलले असेल, पण वाचण्याची सवय मात्र तशीच असेल. काही जण फक्त वृत्तपत्रीय लेखन वाचत असतील, तर काहींना ते देखील व्यर्ज असेल. हे सगळे जरी खरे असले तरी पुस्तके आपले खरे मित्र असतात, हे आपल्या सगळ्यांना नक्कीच पटेल.

नव्या पुस्तकांना येणाऱ्या वेगळ्याच, हव्याहव्याशा वाटणाऱ्या कागदाला येणाऱ्या वासाबरोबरच मुखपृष्ठामुळे वाचनाची आवड असणारा आणि नसणाराही सहजच त्या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. अनेक जण वाचण्यासाठी तर काही जण शोकेसमध्ये ठेवायला चांगली दिसतील म्हणून का होईना पुस्तके खरेदी करतो. किती पुस्तके घ्यायची आणि कोठे ठेवायची असा प्रश्न असणारी मंडळी पहिली पुस्तके मित्रमंडळींना, ग्रंथालयांना भेट देत नवीन पुस्तके खरेदी करतात. तर काही जण या सगळ्यापासून ‘वाचण्या’साठी आणि आपल्या ‘वाचण्या’च्या हौसेसाठी ग्रंथालयाचे सभासद होणे पसंत करतात. ‘वाचण्या’ची हौस असलेली काही मंडळी मात्र या दोन्ही गोष्टी, म्हणजे पुस्तके विकत घेणे आणि ग्रंथालयांचे सभासद होणे यापासून दूर असतात. अशा लोकांना पुस्तकांचे, वाचण्याचे महत्त्व पटावे, त्यांनी ग्रंथालयाचे सभासद व्हावे म्हणून पुण्यातील एका ग्रंथालयाने एका अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

नारायण पेठ येथील पुणे मराठी ग्रंथालयाने ‘पथनाटय़’ सादरीकरणातून पुस्तक वाचनाचे महत्त्व सांगण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वाचकांना ग्रंथालयाकडे आकर्षित करीत असतानाच आपल्या सहकाऱ्यांच्या कामातील तोचतोचपणा कमी करावा, ग्रंथालयासाठी काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने ग्रंथपाल संजीवनी अत्रे यांनी पथनाटय़ सादरीकरणाचा केवळ विचार न करता आपली कल्पना कृतीत आणली. अर्थातच ग्रंथालयातील वरिष्ठ तसेच सहकारी हेमंत कुलकर्णी, धनंजय बर्वे, सुधीर इनामदार, डॉ. अनुजा कुलकर्णी यांच्या परवानगीने अत्रे यांनी सात मिनिटांचे पथनाटय़ लिहिले आणि तेही अवघ्या काही मिनिटांतच.

या पथनाटय़ात काम करण्यासाठी देखील ग्रंथालयातील सहकारी ज्यांनी याआधी कधीही अभिनय केलेला नाही, त्यांना अत्रे यांनी या पथनाटय़ासाठी उभे केले. अर्चना बगाडे, प्राची वैशंपायन, मंजिरी वाघ, श्व्ोता पाठक, कोमल गायकवाड, कोमल झाड आदी कलाकरांनी त्यांचे उत्तम काम बजावत ‘ग्रंथालय आणि पुस्तकाचे महत्त्व’ या पथनाटय़ासाठी मेहनत घेतली आहे. त्यांना सादरीकरणासाठी ललिता मोसकर, मानसी उजळंबकर, संचिता डेंगळे, सुषमा सरदेशपांडे, शरयू पाटील, प्रज्ञा देवल, संगीता रकटेमी आदींची मदत आणि प्रोत्साहन मिळाल्यामुळे वाचनाचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत जाते आहे.

उद्या सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार, शनिवार, सोमवार हे सहा दिवस गणेशनगर, गोखलेनगर, कोथरूड, आनंदनगर, डेक्कन जिमखाना, बिबवेवाडी, सहकारनगर या केंद्रांवर सायंकाळच्या वेळेत इच्छुकांना हे पथनाटय़ सायंकाळी साडेपाच, सहा, साडेसहा, सात अशा केंद्रानुरूप ठरलेल्या वेळेत बघता येणार आहेत.

नारायण पेठेत नुकतेच सादर करण्यात आलेल्या या पथनाटय़ाला सुमारे अडीचशे प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या पथनाटय़ामुळे वाचनाचे महत्त्व पटल्याचे सांगत असतानाच प्रेक्षकांनी नित्यनेमे वाचण्याचा मानस व्यक्त केला.

श्रीराम ओक – shriram.oak@expressindia.com

First Published on February 12, 2017 1:00 am

Web Title: street play to show importance of book reading