अमृता सुभाष, अभिनेत्री

जेव्हा अभिनय क्षेत्रात आले तेव्हा मला वाटायचे गोष्टींचा ताण घेतल्यावर त्या चांगल्या होतात. पण आता मला तसे अजिबात वाटत नाही. कोणत्याही गोष्टीची मजा घेऊन ती करत राहणे हे आता मला जास्त महत्त्वाचे वाटायला लागले आहे. ताणाकडे सकारात्मकरीत्या पाहता येत नसणे ही एक पातळी आहे. जी प्रत्येकाच्याच आयुष्यात येते. किम किडूक हे कोरियन दिग्दर्शक आहेत. त्यांनी एका महोत्सवात ‘आरे रांग आरे रांग आरे रांग रे’ हे गाणे गायले होते. याचा अर्थ ‘खाली वर खाली वर खाली वर रे’ असा होतो. म्हणजेच काय तर खाली वर हे गातापण येते आणि रडतासुद्धा येते. मी रोज हे गाणं म्हणतेच. माझ्या आयुष्यात व्यायामाला खूप महत्त्व आहे. ताण काय हे आपल्या सर्वानाच आहेत. प्रश्न असा आहे की आपण त्यासाठी किती जण सजकतेने मेहनत करतो? शरीर हे एक यंत्र असून शरीर आणि मन हे एकमेकांशी जुळलेलं आहे. त्या शरीराला तुम्ही चालतंबोलतं ठेवलं नाही तर त्याचा परिणाम थेट तुमच्या मनावर होणारच आहे.

सकाळी साडेसहा वाजता उठल्यावर सात वाजता मी मैदानावर असते. हिरव्यागार मैदानावर व्यायामाचे सर्व प्रकार करते. म्हणजेच माझा ताण कमी होण्यासाठी मी स्व:त प्रयत्न करते. सर्वानीच ते करायला हवेत. मला स्वत:ला गाण्यातून मुक्त वाटते. गाण्यातल्या तानेमुळे माझी ताणमुक्ती होते. गाणे म्हणणे-ऐकणे हे मला खूप आवडते. रियाज करताना जो सा लागतो आणि त्यामुळे जी कंपने निर्माण होतात त्यामुळे आपण मुक्त होत जात असतो. वेगवेगळे छंद जोपासणे हासुद्धा एक रियाजच आहे. आपण आवडीचे काम करत राहिल्यावर मनावरील ताण आपोआपच कमी होतो.

एका शेतकऱ्याला कुणीतरी सांगते, जितका पळशील तितकी जमीन तुझी. तो इतका पळतो की ती जमीन घेण्यासाठी तोच राहात नाही. त्यामुळे मला असे वाटते की किती हवे याला अंत नाही. कुठेतरी आपणच स्वत:ला सांगायला हवे आता पुरे. सध्या मानसोपचार पद्धती हे क्षेत्र खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी स्वत: ती घेते आणि इतरांनीही ती घ्यावी असे मला वाटते. आपल्या ताणांकडे पाहायची, त्यांना समजून घ्यायची, सांभाळायची एकूणच प्रक्रिया आपल्याला या उपचार पद्धतीमुळे शिकता येतं आणि ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं.

पाडगावकरांची एक कविता आहे,

तुलना करीत बसायचे नसते गं

प्रत्येकाच्या आत एक फुलणारे फूल असते

प्रत्येकाच्या आत एक खेळणारे मूल असते

फुलणाऱ्या त्या फुलासाठी खेळणाऱ्या त्या मुलासाठी

दार उघड,

चिऊताई चिऊताई दार उघड

या ओळींत सगळ्याच मुक्तीची तान आहे.

शब्दांकन: सौरव आंबवणे