|| निलेश अडसूळ

वाढत्या करोना कहराने राज्यात कठोर निर्बंध लागू केल्याने चित्रीकरणही ठप्प झाले, परंतु मनोरंजनात खंड पडू नये या उद्देशाने वाहिन्यांनी राज्याबाहेर जाऊन चित्रीकरण सुरू केले. केवळ चित्रीकरणच नाही तर आशय, विषय, कथाभाग आणि रंजकता याला जरासाही धक्का न लावता सध्या मालिका अविरत सुरू आहेत; किंबहुना त्या अधिक ‘धमाकेदार’ भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या रंजकतेचा भडिमार सुरू आहे. धक्कातंत्राचा वापर करून प्रेक्षकांना आपलेसे करण्यात ही मालिका यशस्वी झालेली आहे. एकीकडे अरुंधतीला दु:खातून बाहेर काढणारी अनघा, आज तिची सून होऊ पाहत असतानाच मालिकेने मोठे वळण घेतले आहे. अनघा आणि अभीचा साखरपुडा होत असतानाच संजनाच्या कारस्थानाचा मोठा फटका देशमुख कुटुंबाला बसणार आहे. येत्या भागात, संजनाने केलेल्या चहाडीमुळे अंकिता आत्महत्येचे पाऊल उचलते. ही वार्ता ऐकताच अभी साखरपुडा सोडून अंकिताकडे जातो. तो परततोही, पण… येताना अंकिताशी लग्न करून येतो. त्यामुळे एकीकडे अनघाचा विश्वासघात, अरुंधतीला बसलेला मानसिक धक्का यामुळे घरातील वातावरण पुन्हा एकदा बिघडणार आहे, असा आशय पाहायला मिळेल. या आशयातून अनघा आणि अरुंधती या सोशीक घटकांवर नियती पुन्हा अन्यायच करते, असे चित्र उभे राहते. त्यामुळे त्या दोघी या दु:खावर कशी मात करणार, अनघाच्या आयुष्याचे काय, अभी इतका समंजस मुलगा असताना तो अंकिताला बळी कसा पडला, असे अनेक प्रश्न समोर आले आहेत. कदाचित अनघाच्या येण्याने घराचे सुखचित्र झालेही असते, सकारात्मक बाबी घडल्याही असत्या, पण कदाचित नियतीच्या म्हणजे लेखकांच्या मनात आणखी काही असावे.

याच वाहिनीवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत शुभम जागतिक दर्जाच्या ‘इंडियाज बेस्ट कूक’ पाककला स्पर्धेत भाग घेणार आहे. विशेष म्हणजे कीर्तीमुळे तो या ठिकाणी पोहोचला आहे. शुभमच्या हातात असलेली पाककला सर्वांना माहिती आहेच, परंतु ती जागतिक स्तरावर नेण्यासाठी कीर्तीचा आटापिटा सुरू आहे. या स्पर्धेला जीजी अक्कांचा नकार आहे, शुभमचीही फारशी इच्छा नाही; परंतु त्यांना स्पर्धेचे महत्त्व पटवून देण्यासाठी कीर्तीने कंबर कसली आहे. आता कीर्तीच्या या प्रयत्नांना यश मिळणार का? शुभम या पाककला स्पर्धेसाठी कशी तयारी करणार आणि या स्पर्धेत तो आपली चमक दाखवणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेत राजा-राणीभोवती असलेला कौटुंबिक आशय चांगलाच रंगू लागला आहे. एरव्ही संजू संजू करत मागे फिरणारा तिचा धाकटा दीर सुजीत तिच्या विरोधात गेला आहे. अपर्णा आणि सुजीतच्या लग्नाची बोलणी सध्या या मालिकेत सुरू आहेत. संजीवनीचा या लग्नाला विरोध असल्याने आईसाहेब या लग्नाला होकार देतात; पण अपर्णाचे खरे रूप अद्याप कुणालाही कळलेले नाही. ते समोर आणण्यासाठी सुरू असलेला संजीवनीचा प्रयत्न यशस्वी होईल का हे आगामी भागात कळणार आहे. यादरम्यान, अपर्णा संजीवनीला आव्हान देते, आता ते आव्हान काय असेल, त्यात कुणाचा विजय होईल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

तर झी मराठीवरील ‘येऊ कशी तरी मी नांदायला’ या मालिकेतही मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याचे वेध स्वीटूच्या घरच्यांना लागले आहेत; पण ओम मात्र हा साखरपुडा होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. मोहितमध्ये असलेला अहंभाव, स्वीटूशी लग्न करण्यामागची त्याची धारणा आणि त्याचे मनसुबे ओम ओळखून आहे. आता ते स्वीटूच्या घरच्यापर्यंत आणण्यासाठी ओम स्वत: त्यांच्या घरी राहायला गेलाय. आता साखरपुड्यापर्यंत ओम रोज मोहितला विविध प्रसंगांतून आपली पायरी दाखवणार आहे. त्यामुळे साखरपुडा होणार का, मोहितला पश्चात्ताप होईल का आणि ओम-स्वीटूचे नाते सगळे मान्य करतील का हे पाहणे अधिक रंजक ठरणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘श्रीमंताघरची सून’ या मालिकेत अभिनेत्री सुप्रिया पाठारे दिसणार आहेत.  निर्बंधांनंतर गेले काही दिवस या मालिकेचे जुनेच भाग दाखवले जात होते; पण याही मालिकेने राज्याबाहेर चित्रीकरण सुरू केले आहे. १७ मेपासून मालिकेचे हे नवीन भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. कर्णिक कुटुंबातील एक महत्त्वाचे पात्र म्हणजे ‘देविका’. सध्या ही भूमिका चांगलीच पसंतीस उतरली होती; परंतु काही कारणामुळे देविकाची भूमिका आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहेत. त्यामुळे आता अधिकच रंजक आशय प्रेक्षकांना पाहता येईल.

नवी मालिका

‘बायको अशी हव्वी’ ही नवी मालिका येत्या १७ मेपासून कलर्स मराठीवर येणार आहे. काही कुटुंबांत सर्व अधिकार पुरुषांच्या हाती असतात. घरातल्या स्त्रीला अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक बायकोचे दु:ख कधीही समजून घेत नाही; पण तरीही ती सर्व सहन करत आपली कर्तव्ये पार पडत असते. तिला आपण किती गृहीत धरतो. सासरच्यांना सून अशी हवी असते जी घरातल्या चौकटीत बसेल आणि नवऱ्याला अशी बायको हवी जी त्याच्या अपेक्षांना पूर्ण करेल, याच धाग्याला घेऊन ही मालिका साकारली आहे. मालिकेची निर्मिती युफोरिया प्रॉडक्शन्स आणि पिकोलो फिल्म्सने केली असून लेखन-दिग्दर्शन विरेन प्रधान यांचे आहे. मालिकेबद्दल बोलताना मराठी टेलिव्हिजन, वायाकॉम १८चे, प्रमुख दीपक राजाध्यक्ष म्हणाले, ‘आपल्याकडे अनेक वर्षांपासून लग्न म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे, कुटुंबाचा सांभाळ तुलाच करायचा आहे, असे मुलींना सांगितले जाते. संसार दोघांचा असतानाही अपेक्षा मात्र फक्त मुलीकडून केल्या जातात, तिला गृहीत धरले जाते, पुरुषांनी आखून दिलेल्या कुंपणात तिला जगावे लागले; पण जुन्या विचारांचे कुंपण तोडून, खऱ्या अर्थाने जोडीदारासोबत संसाराचे नवे चित्र उभे करू पाहणाऱ्या एका मनस्वी नायिकेची ही कथा आहे.’