प्रत्येक अभिनेत्याने इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी कमी जास्त प्रमाणात स्ट्रगल केलेला असतो. त्याचप्रमाणे या अभिनेत्यानेही बॉलिवूडमध्ये येण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. संघाच्या शाखेत जाणारा हा कार्यकर्ता तारुण्यात विद्यार्थी राजकारणात सक्रीय होता. विशेष म्हणजे विद्यार्थीदशेत काही कारणावरुन त्याला पोलीसकोठडीतही जावे लागले होते. इतकेच नाही तर या सगळ्यानंतर एका हॉटेलमध्ये या अभिनेत्याने शेफचे काम केले होते. एकेकाळी ज्याठिकाणी हा अभिनेता कांदा कापण्यापासून सगळे काम करायचा आज याचठिकाणी त्याच्या मुलाखती घेतल्या जातात. या अभिनेत्याचे नाव आहे पंकड त्रिपाठी.

एका टीव्ही शोमध्ये या अभिनेत्याने याबाबतची माहिती दिली. तो म्हणाला, मी माझ्या गावामध्ये काही दिवस संघाच्या शाखेत जात होतो. मात्र त्याठिकाणी कोणतेही राजकारणाचे ट्रेनिंग दिले जात नव्हते. त्यानंतर मी पुढील शिक्षणासाठी पटणा येथे आलो. त्यावेळी शिक्षणात लक्ष न लागल्याने मी विद्यार्थी राजकारणात सक्रीय झालो. मी एक सामान्य विद्यार्थी होतो मात्र काही जोक सांगून, किस्से सांगून लोकांना एकत्र करण्याचे कौशल्य माझ्यात होते. मग मी ते करायचो आणि नंतर नेते येऊन भाषण करायचे. मात्र त्यातूनही काही काळाने माझे मन उठले. माझा मुलगा नेता आहे असे कोणी म्हटले तर त्याच्याकडे चांगल्यादृष्टीने पाहिले जायचे नाही. मात्र सगळेच असे असतात असे नाही.

मग २००१ मध्ये मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जायचे ठरवले. चार वर्षं याठिकाणी शिक्षण घेतल्यानंतर मी काही लहानमोठी कामे करायला लागलो. त्यानंतर मी काही जाहिरातींमध्ये काम केले. त्यानंतर मला काही चित्रपटही मिळाले. मी आमच्या परिवारातील पहिला व्यक्ती होतो जो चित्रपटसृष्टीत काम करत होतो. या क्षेत्रात कोणतीही ओळख नसल्याने थोडा जास्त संघर्ष करावा लागला. पण आयुष्यात आलेल्या या चढउतारांमुळे माझा अभिनय जास्त चांगला होत गेला.