23 February 2019

News Flash

मनोरंजन क्षेत्राच्या वाटेवर काचा गं..

केवळ कलाकार म्हणून मर्यादित न राहता या नाटकाने माणूस म्हणून घडायला शिकवले.

‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात मंगळवारी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने रसिकांशी संवाद साधला. यावेळी तिने रंगभूमीवरील नव्या आव्हानांबाबत होतकरू अभिनेत्रींना सजग केले. (छाया : दीपक जोशी)

अभिनेत्री श्रेया बुगडे हिचा नवोदित अभिनेत्रींना सावध राहण्याचा सल्ला

कास्टिंग काऊचसारखे प्रकार आजही मनोरंजन क्षेत्रात होत आहेत. आपल्या बाबतीत हा प्रकार होऊ नये यासाठी सतर्क राहण्याची जबाबदारी नवीन होतकरू  अभिनेत्रींनी घ्यायला हवी. समाजमाध्यमांवर या विषयी उघडपणे बोलल्या जाणाऱ्या गोष्टींमधून योग्य तो धडा घेऊन या क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरणे महत्त्वाचे आहे, असे मत अभिनेत्री श्रेया बुगडे हिने ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात व्यक्त केले. केसरी प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम ठाण्यातील टीप-टॉप प्लाझा येथे मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’ हा कार्यक्रम लागू बंधू ज्वेलर्स यांच्या सहकार्याने पार पडला.

‘वाटेवरती काचा गं’ या नाटकात लहानपणी भूमिका साकारली होती. या नाटकात लहान मुलांच्या लैंगिक शोषणासारखा महत्त्वाचा विषय हाताळला गेला होता. हा विषय त्या काळाप्रमाणेच आताच्या काळातही तितकाच महत्त्वाचा ठरतो. केवळ कलाकार म्हणून मर्यादित न राहता या नाटकाने माणूस म्हणून घडायला शिकवले. विशिष्ट वयोगटात ज्या गोष्टी सांगणे महत्त्वाचे असते त्या गोष्टी लहान वयात केलेल्या या नाटकातील कामामुळे समजल्या, असे मत अभिनेत्री श्रेया बुगडे हिने या कार्यक्रमात व्यक्त केले.

आपल्याकडे विनोदाचे काही पैलू असतात. विनोदी अभिनयासाठी लागणारी कोणतीही शारीरिक घडण नसल्यास या विनोदी भूमिका साकारणे कठीण असते. ‘चला हवा येऊ द्या’च्या निमित्ताने लोकांना माझ्या विनोदाचा वेगळा रंग अनुभवायला मिळाला. कलाकारही वेगवेगळ्या मानसिक अवस्थेतून जात असतात. आयुष्यात एखादी दुख:द घटना घडल्यावर विनोदातून प्रेक्षकांना हसवणे आव्हानात्मक असले तरी कोणतीही भूमिका साकारण्यासाठी चेहऱ्याला रंग लागल्यावर दु:खाचे बटण बंद करावे लागते.

प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे ठरवल्यावर ही जबाबदारी पूर्ण करण्याचे भान कलाकाराला असायला हवे, असे विनोदाविषयी बोलताना श्रेयाने सांगितले. ‘चला हवा येऊ  द्या’ मालिकेत तीन वर्षे विनोदी भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेत्री म्हणून काही तरी अनोखी भूमिका साकारण्याची इच्छा तिने ‘व्हिवा लाऊंज’ या कार्यक्रमात व्यक्त केली.

परदेश दौऱ्यात तांत्रिक अडचणी

भविष्यातील भूमिकांविषयी विचारले असता, विनोदी अभिनयाव्यतिरिक्त स्मिता पाटील यांनी साकारलेल्या भूमिकांसारखा अभिनय करायला आवडेल, असेही तिने सांगितले. ‘चला हवा येऊ द्या’ परदेश दौरा या मालिकेसंबंधी प्रेक्षकांच्या नाराजीविषयी मत व्यक्त करताना परदेश दौऱ्यात चित्रीकरणादरम्यान तांत्रिक बाबींची अडचण जाणवते. त्यामुळे जे प्रदर्शित करायचे असते ते अनेकदा प्रेक्षकांसमोर मांडण्यात अडथळे येतात. मात्र या कार्यक्रमाचा परदेश दौरा पूर्ण झाल्यावर दर्जात्मक कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येईल, अशी ग्वाही तिने ‘लोकसत्ता ‘व्हिवा लाऊंज’च्या मंचावर दिली.

First Published on February 14, 2018 4:57 am

Web Title: struggles in comedy industry says actress shreya bugde