रेश्मा राईकवार

स्टुडन्ट ऑफ द इअर २

सेल्यूलॉइडच्या पडद्यावर एखादी गोष्ट जिवंत करायची म्हणजे मुळात ती गोष्ट सांगण्याची, चित्रभाषेत लिहिण्याची, कॅमेऱ्यावर चित्रित करण्याची, ज्यांच्यावर ती चित्रित होणार आहे त्यांनाही अभिनयाची विद्या अवगत असण्याची गरज असते. अर्थात, करण जोहरचा चित्रपट असल्याने त्याने पडद्यावर रंगवलेल्या महाविद्यालयातील मुले भलेही सरस्वतीची उपासक नसतील, मात्र त्यांची गोष्ट सांगायला किमान विद्येची गरज असतेच; पण ती विद्या या चित्रपटात कॅमेऱ्यामागे असलेल्यांमध्येही दिसून येत नाही आणि चित्रपटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तर नाहीच नाही. या एका अविद्येने इतके अनर्थ केले..

‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ या चित्रपटाचा सीक्वेल असलेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर २’मध्ये आधीच्या चित्रपटातील एकही गुण नाही. त्यामुळे चित्रपट बघताना तुम्ही कितीही रोहन, शनाया, अभी.. यांना शोधण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा काहीच संदर्भ तुम्हाला सापडत नाही. उलट, तुम्हाला आठवते ते गरिबांचे राजपूत कॉलेज आणि श्रीमंत मुलामुलींचे झेविअर्स कॉलेज. नुसताच मनाने श्रीमंती थाट असलेला रतन लाल शर्मा (आमिर खान), त्याला ‘थापड का बेटा पापड’ म्हणून सतत हिणवून त्याची ‘औकात’ दाखवण्याचा प्रयत्न करणारा शेखर (दीपक तिजोरी) आणि त्यांच्या कॉलेज गँगचा संघर्ष. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जो जीता वही सिकंदर’चा प्रभाव २७ वर्षांनी प्रदर्शित झालेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर २’वर असावा, म्हणजे गेल्या काही वर्षांत कशातच काही बदल झालेला नसावा बहुतेक .. त्यामुळे तो बदल लिखाणात म्हणजे गोष्टीत तरी कसा उतरणार? पण इथेही गोम आहे. म्हणजे गोष्ट सारखी आहे, असे म्हणावे तर त्या चित्रपटात निदान गोष्टीला अनुरूप नाटय़ तरी घडते, इथे दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने ते नाटय़ आणण्याचेही कष्ट घेतलेले नाहीत. अगदी करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ या चित्रपटातही अनेक व्यक्तिरेखा, प्रेम-मैत्री-महाविद्यालयीन स्पर्धा असली तरी निदान अभ्यासाचीही स्पर्धा होती. त्यामुळे खच्चून नाटय़ भरलेले होते आणि रट्टा मार म्हणत गाण्यापुरती का होईना मुले अभ्यास करताना दिसली होती. या चित्रपटात मुले एक तर नृत्य करताना दिसतात किंवा कबड्डी खेळताना दिसतात नाही तर मारामारी करतात.

याही चित्रपटाची कथा डेहराडूनमध्येच घडते. इनमीन चार मुख्य व्यक्तिरेखा आहेत. हिरोला मित्र आहेत, पण ते नावापुरतेच असल्याने त्यांना प्रस्थापित करायचे कष्टच दिग्दर्शकाने घेतलेले नाहीत. ते चित्रपटाच्या शेवटच्या काही प्रसंगात हिरोला कबड्डीचा सामना जिंकून देण्यासाठी उपयोगी पडतात. या चित्रपटात कबड्डीची स्पर्धा होते हा गेल्या २७ वर्षांतील बदल निश्चितच म्हणता येईल, अगदी सामनाजिंकणाऱ्याला प्रो-कबड्डीसाठी खेळता येईल, असाही उल्लेख चित्रपटात येतो. रोहन सचदेवा (टायगर श्रॉफ) हा या चित्रपटाचा हिरो आहे. तो ज्या पिशोरीमल महाविद्यालयात शिकतो आहे, तिथे कुठलीच गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. त्यामुळे आपण या महाविद्यालयात राहिलो तर पुढे जाऊ शकणार नाही, या विचाराने उदास असलेल्या हिरोला त्याची प्रेयसी मिया (तारा सुतारिया) शिकत असलेल्या श्रीमंत अशा सेंट तेरेसा महाविद्यालयात शिष्यवृत्तीच्या आधारे प्रवेश मिळतो. मग या नव्या विश्वात त्याची ओळख गर्भश्रीमंत मानवशी (आदित्य सील) होते. कॉलेजमध्ये सलग दोन र्वष ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ असलेला मानव रोहनसमोर मैत्रीचा हात पुढे करतो आणि मग गोष्ट ‘जो जिता..’वरून ‘एसओटीवाय’पर्यंत पुढे सरकत राहते.

मुळात या चित्रपटाचा नायक टायगर श्रॉफ आहे, त्यामुळे इथे अभ्यासाचा प्रश्नच येत नाही. अ‍ॅक्शन, नृत्य आणि फिट शरीर या तिन्ही गोष्टींसाठी टायगर ओळखला जातो. त्यामुळे चित्रपटात त्याची ही तिन्ही कौशल्ये महत्त्वाची ठरतात आणि त्यात तो नेहमीच्या सहजतेने वावरला आहे. फरक एवढाच आहे की, तो त्याच्याबरोबरीच्या इतर कुठल्याही कलाकारांप्रमाणे महाविद्यालयीन विद्यार्थी वाटत नाही. त्याला त्यासाठी मेहनत करावी लागली आहे. तुलनेने तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि आदित्य सील हे तिघेही त्याच्यापेक्षा तरुण आहेत. तारा सुतारियाने साकारलेल्या मियालाही काही एक व्यक्तिरेखा असली तरी तिला फारसा वाव मिळालेला नाही. त्या तुलनेत अनन्या पांडेच्या वाटेला बिघडलेल्या श्रीमंत मुलीची साचेबद्ध व्यक्तिरेखा असली तरी तिने ती आपल्या पद्धतीने रंगवली असल्याने जास्त प्रभावी ठरते.

‘स्टुडन्ट ऑफ द इअर २’ची आधीच्या चित्रपटाशी कुठल्याच बाबतीत तुलना होऊ शकत नाही. गोष्टीपासून ते कलाकारांपर्यंत तो चित्रपट प्रत्येक बाबतीत वरचढ होता. इथे मुळातच चित्रपट लेखनात फसलेला आहे. त्यात गोष्टच नसल्याने इथूनतिथून प्रसंग जोडत चित्रपट पुढे जातो. हिरोपासून खलनायकापर्यंतची प्रत्येक व्यक्तिरेखा ठरावीक एका चौकटीतूनच लिहिलेली असल्याने त्यातही काही वेगळे सापडत नाही. ‘ये जवानी..’ हे एकमेव रिमिक्स गाणे वगळता इतर कुठलेच गाणे फारसे लक्षात राहत नाही. आधीच्या चित्रपटातील डिम्पी म्हणजे मनज्योत सिंग आणि जीत खुराण साकारणारा साहिल आनंद ही एकमेव जोडी या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये दिसते. गेला बाजार आधीच्या चित्रपटाचे काही संदर्भ जोडण्याचा प्रयत्नही चित्रपटाला काही तरी वेगळेपणा देऊन गेला असता. मात्र कुठलेही बौद्धिक कष्ट न घेता लिहिलेली गोष्ट आणि त्याआधारे चित्रित झालेला हा चित्रपट केलाच कशासाठी? हा एकमेव प्रश्न छळत राहतो.

दिग्दर्शक – पुनीत मल्होत्रा

कलाकार – टायगर श्रॉफ, तारा सुतारिया, अनन्या पांडे, आदित्य सील, गुल पनाग, राजेश कुमार, मानसी जोशी रॉय.