‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते का? हा प्रश्न आजही अनेक भारतीयांच्या मनात आहे. १९८५ पर्यंत उत्तर प्रदेशमधील फैजाबाद येथे वास्तव्य केलेल्या या गुमनामी बाबांच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे नाव ‘गुमनामी’ असे असून त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसेनजित चॅटर्जी याने गुमनामी बाबा ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच श्रीजित मुखर्जी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट येत्या दोन ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित केला जाईल.

चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सर्वप्रथम नेताजींच्या कुटुंबीयांनी या चित्रपटाला विरोध केला होता. नेताजींच्या प्रतिमेचा गैरवापर करुन त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवण्यासाठी या चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचले आणि मग ‘गुमनामी बाबा’ हेच नेताजी सुभाषचंद्र बोस होते का, याचा शोध घेण्यासाठी एक सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा आयोग स्थापन करण्यात आला होता. निवृत्त न्यायमूर्ती विष्णू सहानी यांचा एक सदस्यीय आयोग या प्रकरणाची चौकशी करत होता. अखेर या विविध प्रकारच्या अडथळ्यांतून मार्ग काढत शेवटी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.

‘गुमनामी बाबा’ यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटची १० वर्षे अयोध्या आणि फैजाबाद येथे व्यतीत केली. ते नेताजी सुभाषचंद्र बोस होते असा बहुतेकांचा अंदाज आहे. १९८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नेताजींच्या कुटुंबातील सदस्य ललिता बोस आणि फैजाबादस्थित सुभाष चंद्र बोस विचार मंच यांनी त्यांची ओळख जाहीर करावी यासाठी न्यायालयात धाव घेतली होती.