अभिनेत्री महिमा चौधरी हिने दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर बरेच आरोप केले. सुभाष घई यांनी महिमाला काम मिळू नये यासाठी निर्मात्यांनी मेसेज केल्याचा आरोप महिमाने केला. यानंतर आता घई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “काही गोष्टी या जिथल्या तिथेच विसरुन जायच्या असतात. तरीसुद्धा मी हे म्हणेन की महिमा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. परदेस या चित्रपटानंतरसुद्धा आम्ही एकत्र काम केलंय.” असं म्हणत सुभाष घई यांनी सारवासारव केली.

सुभाष घई म्हणाले, “‘परदेस’ या चित्रपटानंतर महिमानं माझ्या कंपनीसोबत आणखी दोन चित्रपटांत काम करणं अपेक्षित होतं. जर एखादं बॅनर नवोदित कलाकाराला लाँच करत असेल तर त्याने त्या बॅनरसोबत तीन चित्रपट करायचे असतात. करारात हे स्पष्ट केलेलं असतं. महिमालासुद्धा हा नियम लागू होता. मात्र काही निर्मात्यांनी व चित्रपट व्यापार विश्लेषकांनी माझ्या विरोधात महिमाचे कान भरले. आमच्यात गैरसमज निर्माण केले गेले.”

“कामाविषयी आमच्यात अनेकदा बोलणंसुद्धा झालं. काही वर्षांपूर्वी तिने माझ्या कांची या चित्रपटात कामसुद्धा केलं होतं आणि त्यासाठी तिने एकसुद्धा रुपया घेतला नव्हता”, असं त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

काय होते महिमाचे आरोप?

‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, “सुभाष घई यांच्यामुळे मी खूप त्रास सहन केला. त्यांनी मला कोर्टात खेचलं आणि माझा पहिला शो रद्द करायला भाग पाडलं. ते सर्व खूप तापदायक होतं. माझ्यासोबत कोणी काम करू नये यासाठी त्यांनी सर्व निर्मात्यांना मेसेज केले होते. १९९८ किंवा १९९९ मधला ट्रेड गाइड मासिकाचा एखादा अंक पाहिला तर त्यात एक जाहिरात दिली होती. एखाद्याला जर माझ्यासोबत काम करायचं असेल तर आधी त्यांनी सुभाष घईंशी संपर्क साधावा असं त्यात लिहिण्यात आलं होतं. असं न केल्यास तो कराराचा भंग होईल असंही त्यात म्हटलंय. पण मला त्यांची परवागनी घ्यावी लागेल असा कोणताही करार मी त्यांच्यासोबत केला नव्हता. माझ्या बाजूने फक्त चार जण उभे होते. सलमान खान, संजय दत्त, डेविड धवन आणि राजकुमार संतोषी या जणांनी मला खूप पाठिंबा दिला. डेविड धवन यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की तू घाबरू नकोस आणि त्यांना तुला त्रास देण्याची संधी देऊ नकोस. या चौघांव्यतिरिक्त मला कोणाचे फोन कॉल्स आले नाहीत.”