सुभाष घई यांच्याकडून ‘शोमॅन’ च्या आठवणींना उजाळा

राज कपूर यांना सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण होती. त्यामुळेच गरीब श्रीमंतांमधील दरी, अनाथ मुलांचे भावविश्व आणि समाजातील अन्याय, अत्याचार यांचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रपटांमध्ये उमटत असे. त्यामुळेच केवळ मनोरंजन न करता त्याबरोबरच योग्य सामाजिक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणेही राज कपूर यांना शक्य झाले, अशा शब्दांत ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी दिग्दर्शक, अभिनेते ‘शोमॅन’ राज कपूर यांच्या आठवणी सोमवारी जागविल्या.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘कँडिड टॉक्स’ अंतर्गत विविध चित्रपटांचे दिग्दर्शक, कलाकार आणि चित्रपट निर्माते यांना ऐकण्याची संधी चित्रपट रसिकांना मिळत आहे. महोत्सवाचे संचालक आणि अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी सुभाष घई यांच्याशी ‘राज कपूर आणि त्यांचे चित्रपट’ या विषयावर संवाद साधला.

सुभाष घई म्हणाले,‘ चित्रपट या विषयाचे तांत्रिक शिक्षण घेत असतानाही राज कपूर हे कायमच आमच्या अभ्यासाचा आणि आकर्षणाचा विषय होते. दिग्दर्शक म्हणून राज कपूर नेमके कसे होते याची व्याख्या करणे आजही अवघड आहे. काळाच्या पुढे जाऊन विचार करण्याची विलक्षण हातोटी त्यांना अवगत होती. त्यांना काय येत होते यापेक्षा काय येत नव्हते यावर बोलणे जास्त सोपे आहे.’  चित्रपट क्षेत्रातील उमेदवारीच्या काळात काही मित्रांबरोबर ‘खान दोस्त’ हा चित्रपट बनवित होतो. राज कपूर यांना मी लिहिलेली पटकथा आवडली. मोठे अभिनेता असूनदेखील तारखा, मानधन असे कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी त्यामध्ये भूमिका साकारली. ‘करिअर’ च्या सुरुवातीलाच राज कपूर यांच्याकडून आलेला हा अनुभव माझ्या कायम स्मरणात राहणारा असल्याचेही घई यांनी स्पष्ट केले.