झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. यंदाचाही सोहळा तितक्याच दिमाखदार पद्धतीने पार पडला आणि या पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली ‘तुला पाहते रे’ या मालिकेने. अवघ्या दोन महिन्यांत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली असून सर्वत्र या मालिकेचीच चर्चा आहे.

या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता कलाकारांसोबतच प्रेक्षकांनाही असते. यावर्षी ‘लागिरं झालं जी’, ‘बाजी’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘तुला पाहते रे’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली. विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये सुरू झालेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेने नऊ पुरस्कार पटकावले. त्यापाठोपाठ ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेनेही ५ पुरस्कार मिळवले. प्रेक्षकांनी दिलेल्या मतांद्वारे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

वाचा : अंगावर काटा आणणारी ‘पीहू’ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये?

वय विसरायला लावणाऱ्या या प्रेम कहाणीने टीआरपीच्या यादीतही बाजी मारली आहे. ईशा निमकर आणि विक्रम सरंजामे यांची प्रेमकथा आणि मालिकेत दररोज नव्यानं येणारं वळण प्रेक्षकांना खिळवून ठेवते. वयाने मोठा असलेला विक्रांत आणि त्याच्यापेक्षा निम्म्या वयाची ईशा यांची ही प्रेमकथा लोकांना किती पचेल अशी शंका होती. मात्र मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.