सुबोध भावे याची भावना; व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान

अभिनयातील कलेचा आनंद संपेल त्या वेळी माझ्यातील कलाकार राहणार नाही. म्हणूनच माझ्या आनंदासाठी रंगभूमीवर काम करीत असतो, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी व्यक्त केली.

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांच्या हस्ते भावे यांना व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. अजय जोशी आणि योगेश्री  फडके यांनी भावे यांची मुलाखत घेतली.

भावे म्हणाले, अभिनयातून मला आनंद मिळतो. पण एकाच भूमिकेत तेच तेच काम करणे मला भावत नाही. त्याचा कंटाळा येतो. त्यामुळे सतत नवीन शोधण्याचा माझा प्रयत्न असतो. नाटय़ अभिनयाचे कधी प्रशिक्षण

घेतले नाही आणि शिबिरातही गेलो नाही. ज्या ज्या कलाकारांबरोबर काम केले त्या प्रत्येकाकडून शिकता आले. ‘चंद्रपूरच्या जंगलात’ या पहिल्याच नाटकाने माझ्या अभिनयाचा पाया रुजला.

‘नटसम्राट’मधील स्वगत सादर करून भावे यांनी मुलाखतीचा समारोप केला. क्लबचे अध्यक्ष शार्दूल गांधी यांनी प्रास्ताविक केले.