X

‘काशिनाथ घाणेकरांना जीवंतपणे समोर उभं केलंस’, सुबोधवर कौतुकाचा वर्षाव

यंदाचा वाढदिवस सुबोधसाठी फारच खास ठरला आहे.

अभिनेता सुबोध भावेचा आज वाढदिवस. यंदाचा वाढदिवस सुबोधसाठी फारच खास आहे. कारण त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफीसवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे वाढदिवस आणि चित्रपटावर होणारा कौतुकाचा वर्षाव असं डबल सेलिब्रेशन सुबोधसाठी असणार आहे.

‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर बेतलेला आहे. काशिनाथ घाणेकर यांचा उदय आणि अस्त या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. चित्रपट जरी सबकुछ सुबोध भावे असला तरी कलाकारांचं अभिनय, दिग्दर्शन उत्तम झाल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत. सोशल मीडियावर सध्या सुबोधवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या चित्रपटात सुबोधसोबतच सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, आनंद इंगळे, प्रसाद ओक यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपट प्रदर्शनापूर्वी सुबोधने ट्विटरवर एक पोल घेतला होता. यंदा दिवाळीत ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ बघणार की ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’, असा प्रश्न त्याने विचारला होता. या पोलमध्ये ७८ टक्के लोकांनी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ला मत दिलं तर २२ टक्के लोकांनी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा पर्याय निवडला होता.