रायगड जिल्ह्यातील महाड शहरात ‘तारीक पॅलेस’ ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाली आहे. या दुदैवी घटनेत आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही १८ ते १९ जण दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान या दुदैवी घटनेवर अभिनेता सुबोध भावे याने दु:ख व्यक्त केलं आहे.

“महाडमध्ये जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. जखमी लवकर बरे होवोत, आणि मृतांच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडण्याची ताकद ईश्वर देवो. इमारत असो व समाज, पाया हा मजबुतच हवा.” असं ट्विट करुन सुबोधने या दुदैवी घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- महाड इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १८ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न

आणखी वाचा- महाड इमारत दुर्घटना : बिल्डरसह पाच जणांवर गुन्हा दाखल, बचावकार्य अजूनही सुरूच

या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरसह तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिल्डर फारूक काझी याच्यासह आरसीसी कन्सल्टंट बाहुबली धमाणे, वास्तुविशारद गौरव शहा, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक जिंदाड, अभियंता शशिकांत दिघे यांच्याविरोधात गुन्हा झाला आहे. साधारणपणे पाच वर्षांपूर्वी या इमारतीचं बांधकाम झालं होतं अशी माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हेलकावे खात असल्याची तक्रार रहिवाशांनी विकासकाकडे केली होती. मात्र, या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे समजत आहे. इमारतीमध्ये ४५ फ्लॅट होते. ज्यापैकी १८ फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये ३० जण दुर्घटनेची चाहूल लागताचय इमारतीतून बाहेर पडले. आठ जण बेपत्ता आहेत. तर बि विंग मध्ये ६० लोक राहत होते. यापैकी ५१ जण बाहेर पडले. तर नऊ जण बेपत्ता आहेत. व दोन इतर असे एकुण १८ ते १९ जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. ढिगारा उपसण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. रात्री एक वाजताच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लगेचच मदत व बचाव कार्य सुरु केले. पहाटे पर्यंत वरच्या दोन मजल्यांचा ढिगारा उपसण्यात आला आहे.