‘स्वच्छ भारत अभियान: एक कदम स्वच्छता की ओर’ हे वाक्य वर्षानुवर्ष आपण ऐकत किंवा वाचत आहोत. देशातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण आणि चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र सरकारने ‘स्वच्छ भारत अभियान’ संपूर्ण देशात राबवण्यास सुरुवात केली. मात्र हे अभियान इतर लोकोपयोगी अभियानांप्रमाणेच काहीसे बारगळलेले दिसते. काही मंडळी कचरापेटी डोळ्यांसमोर असतानाही रस्त्यावरच कचरा फेकताना दिसतात. याचे एक ताजे उदाहरण मराठी अभिनेता सुबोध भावे याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

सुबोधने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये रस्त्यावर फेकलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या दिसत आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ २० मीटर अंतरावर कचरापेटी असतानाही कोणा अज्ञात व्यक्तीने पाण्याच्या बाटल्या रस्त्यावरच फेकलेल्या दिसत आहेत. या प्रकारावर “जेव्हा आपण हे २० मीटरच अंतर गाठु तेव्हा आपला देश आपोआप बदलेल… आपला देश, स्वच्छ देश” अशा शब्दात सुबोधने आपला संताप व्यक्त केला आहे.

सुबोध भावे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो नेहमीच आपली मते रोखठोकपणे मांडताना दिसतो. यावेळेस त्याने रस्त्यांवरील अस्वच्छतेबाबत आपले मत मांडले आहे. त्याने केलेले हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.