नाताळच्या सुट्टीचे निमित्त साधून मध्य रेल्वेने २५ डिसेंबर रोजी ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला होता. ख्रिसमसच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असली तरी अनेक खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे कामकाज मात्र सुरु होते. त्यामुळे डोंबिवली ते ठाणे स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती. डोंबिवली स्टेशनवरच्या भीषण गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओला रिट्विट करत मराठी अभिनेता सुबोध भावेने खंत व्यक्त केली आहे.

‘भयानक आहे हे, आणि हे रोज जगावं लागतं’ असे म्हणत त्याने खंत व्यक्त केली. त्यानंतर त्याने राजकारणी यांना आवाहन करत मुंबईकरांच्या वतीने विनंती केली आहे. ‘ही वेळ दोषारोप करण्याची नाहीये तर खरोखरी मनापासून या सर्वांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्याची आहे.भारतीय रेल्वे सक्षम आहेच. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रीत प्रयत्न करावे हीच तमाम मुंबईकरांच्या वतीने विनंती’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

हा मेगाब्लॉक कल्याण ते डोंबिवली स्थानकादरम्यान सकाळी १० वाजल्यापासून ते दुपारी २ पर्यंत होता. हा एकूण चार तासांचा विशेष मेगाब्लॉक होता. मेगाब्लॉकमुळे १२४ लोकल, १६ लांब पल्ल्याच्या गाड्या चार तासांच्या अवधीत रद्द करण्यात आल्या होत्या. विनाअडथळा हे काम पूर्ण व्हावे यासाठी कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यानची लोकल सेवा सकाळी सव्वानऊ ते दुपारी दुपारी पावणेदोन कालावधीत बंद ठेवण्यात आली. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पादचारी पूल बांधून तयार होता. या पुलावर सहा मीटर लांबीचे चार गर्डर शक्तिशाली क्रेनच्या साहाय्याने ठेवण्यात आले.

काय म्हणतात या कोंडीवर डोंबिवलीकर?

डोंबिवलीकरांना सरकार कडून काही अपेक्षा आहेत. त्यांच म्हणनं आहे की, रेल्वेचे सगळ्यात जास्त प्रवासी हे डोंबिवलीचे आहेत. तरी आता पर्यंत प्रशासनाने त्यांना मदत केली नाही. आता तरी सरकारने काही तरी करायला हवं. डोंबिवली पासून सुरू होणाऱ्या ट्रेनची संख्या कमी असल्याने लोकांना लटकत प्रवास करावा लागतो. लांबचा प्रवास करणाऱ्यांना फास्ट ट्रेनची गरज आहे. डोंबिवलीपासून सुरू होणाऱ्या फास्ट ट्रेन नाहीत त्या सुरु केल्या पाहिजेत. जेणे करून लोकांचा प्रवास सुखद होईल.