प्रत्येक क्षणी जगाशी ‘कनेक्ट’ राहण्याच्या हव्यासापायी माणसाचं खासगीपणच संपुष्टात आलंय. सोशल मीडियावर प्रत्येक गोष्ट ‘शेअर’ करण्याच्या अट्टहासानं ‘सेल्फी’ नावाचं फॅड सर्वदूर फोफावलंय. पण या सेल्फीने जगभरात अनेकांचा बळी घेतला आहे. ‘शार्क माशापेक्षा जास्त बळी मोबाइलमधल्या सेल्फीने घेतले,’ असं मत अभिनेता सुबोध भावेनं व्यक्त केलं आहे. नुकतंच त्याने लोकांमध्ये सेल्फीबद्दल असलेल्या वेडाबाबत ट्विट केलं आहे.

‘शार्क माशापेक्षा जास्त बळी मोबाइलमधल्या सेल्फीनी घेतले. टॉयलेट आणि स्मशानात ज्यादिवशी सेल्फी घ्यायला लागले त्या दिवशीच खरंतर आधी बुध्दी मेली आणि मग स्वतःचा जीवही गमवायला लागले. भान नसणं आणि सुटणं याचं उत्तम उदाहरण म्हणजे सेल्फी,’ असं त्याने ट्विटमध्ये म्हटलंय.

२०११ ते २०१७ या वर्षांमध्ये एकूण २५० जणांनी त्यांचा जीव गमावला आहे. दरवर्षी साधारण ४३ जणांचा जीव गेला आहे. काही माणसे सेल्फी काढताना बुडून मेली आहेत तर काही माणसे सेल्फी काढताना उंचावरून पडून मेली आहेत. धोकादायक ठिकाणाहून सेल्फी काढणे लोकांच्या जीवावर बेतले आहे. सेल्फीची क्रेझ असणाऱ्या लोकांसाठी तो त्यांचा शेवटचाच सेल्फी ठरला आहे असंच म्हणता येईल.