प्रत्येक व्यक्तीने यशाचे शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. इच्छाशक्तीद्वारेच व्यक्तीला यशाचे शिखर गाठता येते. दृढविश्वास आणि कामावर निष्ठा ठेवून व्यक्तीने ध्येय साधण्यासाठी श्रमाचे मूल्य जाणले पाहिजे, असे प्रतिपादन मराठी चित्रपट अभिनेत्री सई ताम्हणकर हिने केले.
येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित गणेशोत्सवाच्या एका कार्यक्रमात ती बोलत होती. सध्या गाजत असलेल्या ‘दुनियादारी’ या मराठी  चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या सईने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर जगदंबा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शीतल वातीले, प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सईने यावेळी चित्रपट क्षेत्रात आलेल्या विविध अडचणी व अनुभव कथन केले. अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी सईकडून प्रश्नोत्तराच्या स्वरूपात चित्रपटक्षेत्राची माहिती करून घेतली. करिअरची सुरुवात करताना ज्या क्षेत्रात जायची इच्छा असेल त्याच मार्गाने जावे, असा सल्लाही विद्यार्थ्यांना यावेळी तिने दिला. यश सहजासहजी मिळत नाही हे सत्य असले तरी प्रयत्न करणे आपले कर्तव्य असल्याचे सईने सांगितले. आपल्या ‘दुनियादारी’ या चित्रपटाबद्दल बोलताना तिने प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिल्यामुळेच तो संपूर्ण महाराष्ट्रात हाउसफुल्ल चालला, असे ती म्हणाली. यावेळी तिने या चित्रपटातील कॅडबरीचा संवाद म्हणून दाखविला. देशात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांनी आपण व्यथित होत असून, बलात्काऱ्यांना फाशीच दिली पाहिजे, असे मत तिने व्यक्त केले.
यावेळी सईच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. इंजिनिअिरगच्या सर्व विद्यार्थ्यांंना शुभेच्छा देऊन सईने महोत्सवात विद्यार्थिनींसोबत ठेका धरत रंगत आणली. महाविद्यालयाचे अध्यक्ष शीतल वातीले व कुटुंबीयांनी सईचे स्वागत केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.