सचिन हे नाव प्रत्येक माणसाच्या हृदयाजवळचं. या नावाची जादू अनेकांना मोहिनी घालते. कारण तसंच आहे, भारतरत्न सचिन तेंडुलकर, सचिन पिळगांवकर अशा नावातून आत्मविश्वास, धैर्य, जिद्द, चिकाटी असं खूप काही हे नाव सांगून जातं. सचिन दूबाले पाटील हे नाव सध्या चित्रपट सृष्टीत चर्चेत आहे. मूळचा बीडचा असणारा हा युवक कामानिमित्ताने पुण्यात आला आणि त्याने त्याच्या आयुष्याचा प्रवास अत्यंत बिकट परिस्थितीतून सुरू केला. कोणतेही काम कमी न समजता त्याने हाताला मिळेल ते काम सुरू केले.

जवळपास सहा चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माता म्हणून चोख कामगिरी बजावणारा सचिन मोठ्या हिमतीने चित्रपटसृष्टीत प्रामाणिकपणे काम करतोय.

सचिनने नुकतीच बिग बजेट व मल्टिस्टार कास्ट असणारा ‘अ.ब.क’ या चित्रपटाची कार्यकारी निर्माता म्हणून धुरा संभाळली होती. त्याआधी त्याने ‘आयटमगिरी’, ‘बाजार’, ‘हेडलाईन’ या चित्रपटांसाठी काम केलं. त्याचप्रमाणे आगामी ‘आटपाडी नाईट्स’, ‘खिचीक’, ‘कॉलेज डायरी’ असे त्याचे चित्रपट आहेत. सचिनने कार्यकारी निर्माता म्हणून षटकार मारला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.