एका चित्रपट रसिक पिढीला मधुबालाचे अकाली जाण्याचा धक्का पचवणे जड गेले. मधुबालाचे अवघ्या ३६ व्या वर्षीच कर्करोगाने निधन झाले (२३ फेब्रुवारी १९६९). स्मिता पाटील वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षीच आपल्यातून निघून गेली यावर कित्येक दिवस विश्वासच बसत नव्हता (१३ डिसेंबर १९८६). प्रतिकला जन्म देताच अवघ्या काही दिवसातच हे घडावे हे सगळेच सुन्न करणारे होते. दिव्या भारतीचे अपघाती निधन की आत्महत्या या प्रश्नाचे कधी उत्तरच नीट सापडले नाही. तेव्हा ती अवघी १९ वर्षांची होती (५ एप्रिल १९९३). दुसरा दिवस उजाडला तोच या धक्कादायक बातमीने. या घटनेनंतर अनेक गोष्टींची उलटसुलट चर्चा झाली. विशेषतः बॉलीवूड व अंडरवर्ल्ड कनेक्शनची! परवीन बाबीचे निधन झालयं हे समजले ते जुहू येथील तिच्या कालूमल इस्टेट इमारतीतील खोलीचा पोलिसांनी दरवाजा फोडला तेव्हा (२० जानेवारी २००५) ते तर अनपेक्षित होते . तेव्हा तिचे वय ५६ वर्षे होते. आणि आता श्रीदेवीच्या जाण्याचा अनपेक्षित धक्का.

प्रत्येक दशकात अशी एक तरी सुन्न करणारी दुर्दैवी गोष्ट घडलीय. या अभिनेत्रींच्या अकाली जाण्याची कारणे भिन्न आहेत पण यात एक मोठे सत्य म्हणजे, असे काही होईल याचा कधी कोणी विचारच केला नव्हता आणि त्याच वेळेस असे दिसते की या सेलिब्रेटीजचे आयुष्य देखील क्षणभंगुर ठरू शकते. अनपेक्षितपणे ‘होत्याचे नव्हते’ होऊ शकते. चित्रपट कलाकार कमालीचे सुखवस्तू आयुष्य जगतात अशा पारंपरिक समजाला पूर्णपणे छेद देणार्‍या या गोष्टी आहेत. चित्रपटसृष्टीचे विश्व तसे सुखासीन मानले जाते. आर्थिक सुबत्ता व शारीरिक-मानसिक फिटनेसची त्यानाच अधिक संधी-सुविधा असा समज प्रचलित आहे. आपल्या पथ्याबाबतची जागरुकता व आपण त्यासाठी काय काय करतो यावर ते मनसोक्त मुलाखतीही देत असतात. पण इतके व असे असूनही त्यांच्याही आयुष्याचे रिळ कधीही अचानक तुटू शकते हेच या उदाहरणांवरुन स्पष्ट झालेय. ही झाली दुःखद गोष्टींची ‘दुसरी बाजू’.

या अभिनेत्री खूपच चटका लावून गेल्या. मधुबालासारख्या आरस्पानी सौंदर्य असणार्‍या लोकप्रिय अभिनेत्रीला कॅन्सरने गाठावे ही गोष्टच पचनी पडणे अवघड. तिचा पती किशोरकुमारने तिच्या अखेरच्या काळात तिची भरपूर काळजी घेतली, सेवा केली. स्मिता पाटीलने राज बब्बरची ‘दुसरी पत्नी’ बनणे आश्चर्यकारक होते. तरी तिच्याबद्दलचा आदर कायम राहीला हे विशेष. आजही तिचे अनेक चित्रपट पाहून ‘अभिनयाचे काही धडे’ नक्कीच गिरवता येतील. दिव्या भारतीने चित्रपटसृष्टीत धडाकेबाज आगमन केले. तिच्या स्वभावात कमालीचा वेग आहे, ती खूप फटकळ आहे हे ‘बलवान’, ‘दिल ही तो है’, ‘रंग’ या चित्रपटांच्या सेटवर शूटिंग कव्हरेज निमित्त अनुभवावयास मिळाले. त्याच वेगात ती दुर्दैवाने आपल्यातून गेली. परवीन बाबी सत्तरच्या दशकातील ग्लॅमरस तारका. काहीसे मोकळं-ढाकळं व्यक्तिमत्व. त्यामुळेच तिचा या क्षेत्रात मित्रपरिवार खूप. तरी करियर उतारावर असताना कोणीही साथीला नाही. चित्रपटसृष्टीतील हे एक भयाण वास्तव आहे. येणारे एकाकीपण नकोसे वाटते. म्हणून ती मानसिक शांती व भावनिक साथ यासाठी विदेशात गेली. असे कोणा बाजूला पडणार्‍या स्टारबाबत येथे कोणालाच सहानुभूती नसते. काही वर्षांनी परवीन भारतात परतली हे कसे समजले तर तिने एक प्रसिध्दी प्रमुख नेमून आम्हा सिनेपत्रकारांशी तिची भेट घडवून आणली. तेव्हाची सौंदर्य व आत्मविश्वास हरवलेली, गमावलेली परवीन बाबी पाहणे हा मला तरी नकोसा अनुभव होता. याच चित्रपटसृष्टीचे हे एक विदारक चित्र होते. हेदेखील एक मोठे सत्य आहे हे नाकारता येत नाही. तिला चित्रपटसृष्टीत पुनरागमन करायचे होते. पण तिला पाहताना ते खूप अवघडच वाटत होते. अखेर तिचा दुर्दैवी शेवट झाला. दरवाजाला लावलेले दुध व वृत्तपत्रे दोन दिवस झाले तरी तशीच होती यातच संशयाला जागा मिळाली.

श्रीदेवीबद्दल जे घडलयं ते कोणाच्याही ध्यानीमनीच नव्हते. तिच्या फिटनेस फंडाचे विशेष कौतुक व आकर्षण होते. तिची अभिनय क्षमता व चाहतावर्ग कायम आहे हे ‘इंग्लिश विंग्लीश’, ‘मॉम’ या चित्रपटांनी सिध्दही केले. जुहूच्या मल्टीप्लेक्समधील ‘इंग्लिश विंग्लीश’च्या फर्स्ट लुकच्या वेळचा तिचा कमालीचा आत्मविश्वासपूर्ण वावर आजही स्पष्ट आठवतोय. ती करियर व वयाच्या या टप्प्यातही काही विशेष चित्रपट, काही वेगळ्या भूमिका करेल असेच वाटले होते. पती बोनी कपूर व मुली जान्हवी व खुशीसोबत ती अनेक इव्हेंटमधून, पार्टीतून दिसत होती. कौटुंबिक सुखात ती आहे हेच यावरुन स्पष्ट जाणवत होते. असे सगळेच व्यवस्थित सुरु असतानाच…

या दुःखद घटना भिन्न आहेत पण प्रत्येक अनुभव वा घटना विलक्षण चटका लावून जाणारी आहे. स्टार्स हीदेखील माणसेच असतात, त्यांच्या वाट्याला काय येईल याची पटकथा तयार नसते हेच खरे.
दिलीप ठाकूर