11 December 2017

News Flash

कपिलविरोधात सुनील देणार कृष्णा अभिषेकला साथ?

अली आणि चंदननेही कार्यक्रमासाठी होकार दिलाय.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 11:16 AM

कृष्णा अभिषेक, सुदेश लेहरी, सुनिल ग्रोवर

कपिल शर्माच्या शोची लोकप्रियता कायम असतानाचा सोनी टीव्हीवर लवकरच कृष्णा अभिषेकच्या कॉमेडी टॉक शोचं नियोजन सुरू आहे. या कार्यक्रमाचे नाव ‘कॉमेडी कंपनी’ असल्याचे म्हटले जातेय. कृष्णा अभिषेकचा अनेक वर्षांपासूनचा साथीदार सुदेश लेहरी या कार्यक्रमात दिसेल की नाही अशी अनेकांना शंका होती. अखेर सुदेशने या कार्यक्रमातसुद्धा कृष्णासोबत काम करण्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला.

त्याचप्रमाणे या कार्यक्रमात सुनील ग्रोवर, अली असगर आणि चंदन प्रभाकरसुद्धा झळकणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अली आणि चंदननेही कार्यक्रमासाठी होकार दिलाय. मात्र सुनील ग्रोवरने अद्याप होकार दिला नसून याबाबत त्याच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलं जातंय.

सुनीलने ‘कॉमेडी कंपनीसाठी’ जरी अद्याप होकार दिला नसला तरी तो, अली आणि चंदन पुन्हा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतणार नाहीत हे नक्की. मेलबर्नहून मुंबईमध्ये परतत असताना कपिलने मद्यधुंद अवस्थेत सुनीलला शिवीगाळ केली होती. एवढेच नाही तर त्याच्या दिशेने कपिलने बूटही फेकला होता. यावेळी अली आणि चंदनसोबतही कपिल उद्धटपणे वागला होता. या घटनेनंतर कपिलने अनेकदा माफी मागितली आणि सुनीलला शोमध्ये परतण्यास विनंतीदेखील केली मात्र ते तिघेही कपिलसोबत काम न करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसत आहेत.

वाचा : सुनिल ग्रोवरने केली प्रेक्षकांची निराशा

नुकताच सोनी टीव्हीवर ‘सुपरनाइट विथ ट्युबलाइट’ या दोन तासांच्या विशेष कार्यक्रमात सुनील ग्रोवर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. सलमान खानचा आगामी चित्रपट ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनसाठी हा विशेष कार्यक्रम होता आणि प्रेक्षकांकडूनही या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमानने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये न येता सुनिल ग्रोवरसोबत वेगळा कार्यक्रम करण्याच्या निर्णयामुळे आधीच कपिलची नाचक्की झाली होती. आता जर सुनील ग्रोवर आणि कृष्णा अभिषेक एकत्र येत असतील तर ‘द कपिल शर्मा शो’साठी हे नक्कीच एक मोठं आव्हान असेल.

First Published on June 19, 2017 10:43 am

Web Title: sudesh lehri ali asgar and chandan prabhakar joining krushna abhishek on new show but sunil grover isnt yet confirmed