सिनेमा

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2
सुधाकर रेड्डी यंकट्टी आजवर सगळ्यांना माहीत होते ते सिनेमॅटोग्राफर म्हणून. ‘नाळ’  चित्रपट हा त्यांचा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न. कॅमेऱ्यावर पकड असलेल्या आणि ‘नाळ’मधून आता सिनेमावरही पकड मिळवणाऱ्या या तरुण दिग्दर्शकाशी मारलेल्या गप्पा..

सुधाकर रेड्डी यंकट्टी असं दाक्षिणात्य नाव असलेल्या एखाद्या व्यक्तीने मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करावे आणि तो चित्रपट रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरावा, अशी करामत नुकत्याच आलेल्या ‘नाळ’ चित्रपटामुळे पाहायला मिळाली. नागराज मंजुळे यांचे संवाद आणि अभिनय यामुळे या चित्रपटाला वलय मिळाले असले तरी सुधाकर यांचे पदार्पणातील पहिल्याच चित्रपटाचे दिग्दर्शन हिट ठरले हे नक्कीच. सुधाकर यांच्याशी बोलताना या वलयाने ते हुरळून गेले आहेत असे अजिबात वाटत नाही. किंबहुना त्यांच्या डोक्यात घोळत असलेल्या कथानकाला मिळालेला वाव, त्यांच्या बोलण्यातील समाधानातून डोकावत असतो. खरे तर सुधाकर रेड्डी यांचं शिक्षण सारं आंध्र प्रदेशात झालेले. पण जणू काही ते वर्षांनुवष्रे ‘नाळ’मधील गावातच वाढले असावेत असे चित्रपट पाहताना सतत वाटत राहते. हे नेमके कसे काय झाले याबद्दल सुधाकर सांगतात, ‘आम्ही मूळचे आंध्र प्रदेशातील गुंटुर जिल्ह्यतले. वडील जमीन घेऊन शेती करता येईल का हे पाहण्यासाठी गाव सोडून िहडत होते. तेव्हा ते गडचिरोली जिल्ह्यच्या जवळ होते. पण शेतीयोग्य जमीन मिळाली नव्हती. गडचिरोली येथे एके ठिकाणी नदीच्या अलीकडे आंध्र प्रदेश आणि पलीकडे महाराष्ट्र आहे. वडील नदी ओलांडून महाराष्ट्रात आले आणि तेथेच स्थिरस्थावर झाले. पण आम्ही भावंडे शिक्षणासाठी गुंटूर येथेच राहत होतो. सुट्टीत आईवडिलांकडे महाराष्ट्रातील गावात यायचे आणि नंतर परत गुंटूरला जायचे. त्यामुळे गावातील वातावरण, नदी, शेती, जंगल, लोकांचे वागणे हे सारे मी पाहिलेले होते. अनेक वष्रे चांगलेच अनुभवले होते. त्यामुळे ‘नाळ’मधील वातावरण हे आमच्या घरातील आणि गावातील अनुभवातून उभे राहिले आहे. पण कथा आमच्या घरातील नाही.’

CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Operation Nanhe Farishte 1064 children were rescued
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ काय आहे माहितीये का? मायेला मुकलेल्या चिमुकल्यांना…
artificial intelligence generating revolution in film industry
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेने चित्रपटांना संजीवनी

‘नाळ’च्या कथेची मूळ संकल्पना, बारकावे हे एकदम पठडीबाहेरचे आहेत. ते नेमके कसे काय स्फुरले यावर सुधाकर सांगतात की, आपण बऱ्याच वेळा दत्तक वगरे गोष्टींची चर्चा ऐकत असतो. घरात तीनचार भावंडे असतील तर काही वेळा चेष्टामस्करीमध्ये ‘तू काही आमचा मुलगा नाहीस, तू असाच मिळाला आहेस.’ किंवा ‘तुला असेच उचलून आणले आहे’ वगरे गप्पा अगदी सहज ऐकायला मिळतात. त्यामागे निव्वळ चेष्टामस्करीचाच भाग असतो. पण त्यातून सुधाकर यांना ‘नाळ’चे कथाबीज सुचले. खरेच एखादा मुलगा दत्तक घेतलेला असेल आणि त्याला जर ते कळले तर त्या मुलाच्या मनात नेमके काय होत असेल याचा विचार ते करू लागले. त्यातूनच ही कथा सुचत गेली.

थोडक्यात ‘नाळ’ची कथा, वातावरण हे अनेक वष्रे सुधाकर यांच्या डोक्यात अगदी फिट्ट घोळत होते. पण आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून मुंबईच्या चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण करण्याचा त्यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे. बारावी झाल्यावर पुढे काय करायचा हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. त्या काळातील  (१९९६) ट्रेण्डनुसार त्यांना डॉक्टर किंवा इंजिनीअर अजिबात व्हायचे नव्हते. किंबहुना या गोष्टी करायच्याच नाहीत हे त्यांनी अगदी पक्के  ठरवले होते. त्यावेळी काही मोजके नवीन पर्याय सोडले तर फारसे पर्याय उपलब्धच नव्हते. त्या संदर्भात सुधाकर सांगतात, त्यांना चित्रपटांचे आकर्षण होते. मासिकांतून त्याबद्दल वाचताना एकदा त्यांना फिल्म इन्स्टिटय़ूटबद्दल माहिती मिळाली. चित्रपट क्षेत्रात करिअर करायचे विचार त्यांच्या डोक्यात घोळत होते. पण ते करताना त्यांच्या डोक्यात एक बाब नक्की होती, ती म्हणजे पडद्यावर जे दाखवले जाईल त्याचे नियंत्रण स्वत:च्या हातात असायला हवे. म्हणजेच दिग्दर्शन किंवा सिनेमॅटोग्राफी शिकणे हे पर्याय त्यांच्यासमोर होते. पण फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घ्यायचा तर पदवी असणे आवश्यक होते. आणि ते नुकतेच बारावी झाले होते. त्यामुळे फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये शिकणे बाजूला ठेवून ते मोठय़ा भावाच्या पावलावर पाऊल टाकत करिअरचा एक पर्याय म्हणून मरिन रेडिओ ऑफिसर हा कोर्स करण्यासाठी हैदराबादला आले. पण येथे त्यांच्यासाठी एक वेगळेच क्षेत्र खुले झाले. छायाचित्रणाचा पदवी कोर्स देणारे एक महाविद्यालय त्यांना समजले. लगोलग त्यांनी मरिन रेडिओ ऑफिसरचा विचार बाजूला सारून छायाचित्रणाच्या पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. जेणेकरून आवडीच्या क्षेत्रातील पदवी तर मिळेलच, पण नंतर फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घेता येईल.

आणि तसेच झाले. नंतर फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. पण सिनेमॅटोग्राफी शिकत असले तरी दिग्दर्शक त्यामध्ये दडलेला होताच. २००४ मध्ये युनेस्कोला जगभरातील पाच वेगवेगळ्या प्रदेशांवर एकाच संकल्पनेतून लघुपट करायचे होते. संकल्पना होती ‘सांस्कृतिक भिन्नता, वैविध्य आणि शांतता व संवादाची गरज.’ हे लघुपट एफटीआयआयच्या माध्यमातून होणार होते. सर्व विद्यार्थ्यांकडून आलेल्या स्क्रिप्टमधून सुधाकर यांचे स्क्रिप्ट एशिया पॅसिफिक प्रदेशासाठी निवडण्यात आले. ‘एक आकाश’ नावाचा एक सुंदर लघुपट सुधाकर यांनी त्यातून साकारला. दोन मुलांचे पतंग उडवणे, त्यातून होणारी काटाकाटी, पतंग तुटून दूरवर जाणे, ते परत मिळवताना घडणारे प्रसंग अशी त्याची मांडणी होती. आणि महत्त्वाचे म्हणजे युनेस्कोच्या नियमानुसार यात कसलाही संवाद असणार नव्हता. सुधाकर यांनी हा लघुपट इन्स्टिटय़ूटच्या माध्यमातून तयार तर केलाच, पण त्या लघुपटाला अनेक फेस्टिव्हल्समध्ये गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये परीक्षक विशेष पुरस्कारदेखील मिळाला.

त्यानंतर सुधाकर यांची सिनेमॅटोग्राफर म्हणून कारकीर्द सुरू झाली. मराठीतील आजचे आघाडीचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि ते एकाच वर्गात शिकले. उमेश कुलकर्णी यांच्याबरोबर ‘देऊळ’, ‘विहीर’ (अर्धा भाग), ‘हायवे’ अशा चित्रपटांमध्ये त्यांच्या कॅमेऱ्याने कमाल केली आहे. तर नागराज मंजुळे यांच्याबरोबर त्यांनी मराठीतला विक्रमी यशस्वी चित्रपट ‘सराट’साठीदेखील सिनेमॅटोग्राफी केली आहे. तेलगू, िहदीतदेखील त्यांनी बरीच कामं केली. अलीकडच्याच ‘वीरे दी वेडिंग’ची सिनेमॅटोग्राफी त्यांचीच. पण त्यांच्या डोक्यातील चित्रपटाची कथा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचा एक कच्चा मसुदा त्यांनी कागदावर मांडला होताच. मग त्यांनी त्याचे स्क्रिनप्लेदेखील लिहून काढला. आणि ते सर्व नागराज मंजुळे यांना ऐकवले. नागराज यांना ती कथा आवडली. त्यांनी संवाद लिहिण्याची जबाबदारी घेतली. तर सुधाकर यांनी नागराज यांनी या चित्रपटातील मुलाच्या वडिलांचे काम करण्याचा आग्रह धरला.

अर्थात आज हे सारे सुधाकर यांच्या तोंडून ऐकताना एखादा चित्रपट कसा तयार होत जातो त्याचीच कथा उलगडते. सुधाकर त्यांच्या डोक्यातील कथेवर बरेच वर्ष विचार करत होते हेच यातून लक्षात येते. पण दुसरीकडे ते सिनेमॅटोग्राफर म्हणूनदेखील चांगलेच व्यस्त होते. ते सांगतात की, त्यामुळेच नियोजन करूनच या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विशेष वेळ काढावा लागला. चित्रीकरण हे अनेकदा थोडक्या काळातच होऊन जाते. पण त्यापूर्वी आणि नंतर खूप वेळ जातो असे ते सांगतात. ‘नाळ’च्या पूर्वतयारीत बराच काळ गेला होताच, पण चित्रीकरणानंतर पोस्ट प्रॉडक्शनसाठी वर्षभराचा कालावधी द्यावा लागल्याचे ते नमूद करतात.

एक लहान मुलगा चित्रपटाची मध्यवर्ती व्यक्तिरेखा असल्याने ती निवड अगदी योग्य असणे सर्वात महत्त्वाचे होते. त्याबद्दल सुधाकर सांगतात, ‘हा बालकलाकार शोधण्यासाठी आम्ही अमरावती आणि नागपूरमध्ये जवळपास तीनचारशे मुलांच्या ऑडिशन घेतल्या. त्यानंतर निवडक मुलांची कार्यशाळा घेतली. नंतर मुख्य बालकलाकारासाठी स्वतंत्र कार्यशाळादेखील घेतली. त्यातून पडद्यावरची व्यक्तिरेखा साकारण्यात आली आहे.’ आपल्याकडे बालकलाकारांना घेऊन अनेक चित्रपट तयार होत असतात. त्यांना चांगला प्रतिसाददेखील मिळतो, पण कधीकधी ते कृत्रिम वाटतात. त्या पाश्र्वभूमीवर या बालकलाकारांना प्रशिक्षण देण्याबद्दल सुधाकर सांगतात, ‘मुले बहुतांशपणे नसíगक अभिनयच करत असतात. त्यांना आपण कसे हाताळतो हे महत्त्वाचे असते. त्यांच्या जगात जाऊन त्यांच्यासाठी योग्य अशी मांडणी जर केली तर मग मुलांचा नसíगकपणा टिकून राहतो. मुले कधीच बोलणार नाहीत, वागणार नाहीत अशी छापील कृत्रिम वाक्ये, प्रसंग आपल्या संवादात, दृश्यात असतील तर मुलांचा अभिनय गडबडतो. थोडक्यात तुम्ही मुलांना कसा आकार देता त्यावरच चित्रपटातील त्यांचा वावर अवलंबून असतो.’ चैतन्यची व्यक्तिरेखा साकारणारा ‘नाळ’मधील बालकलाकार श्रीनिवास पोकळे याचे ते खूपच कौतुक करतात. ते सांगतात की, श्रीनिवास मुळातच खूप हुशार मुलगा आहे. त्याला एकदा सांगितलेले कळते. त्यामुळे त्याचा अभिनय उत्तम झाला आहे.’

‘नाळ’च्या कथेबरोबरच त्याची पाश्र्वभूमी आणि वातावरण हेदेखील खूप महत्त्वाचे आहे. सुधाकर यांनी बालपणी या सर्वाचा अनुभव घेतलेला असल्याने चित्रपटाचे लोकेशन त्यांनी अगदी अचूक निवडलेले आहे. भंडारा जिल्ह्य़ातील एका गावातील चित्रीकरणाचा अनुभव हा खूपच हृद्य असल्याचे ते आवर्जून सांगतात. गावाचे नसíगकपण त्यांनी चिटपटात जसेच्या तसे टिकवले आहे, पण कथानकाचे मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यात गरजेनुसार बदल केले आहेत. पण आपल्याला पडद्यावर ते घर पाहताना त्याची अजिबात जाणीव होत नाही. सुधाकर सांगतात की, मूळ घर तसे छोटेच होते. दोन खोल्यांचे. पण कथेच्या गरजेनुसार ते आणखी थोडे वाढवले. त्यासाठी गावात केले जाते तसेच बांधकाम केले होते. पण हे सुधाकर सांगतात तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. त्या घराची रचना नसíगकच वाटत राहते.

चित्रपटाचे कथाबीज सुचणे ते तो पूर्ण चित्रपट तयार होणे या प्रक्रियेत अनेक बाबींचा समावेश असतो. पण काही महत्त्वाच्या बाबी त्यामध्ये अगदी सहजपणे सुरुवातीपासूनच दडलेल्या असतात. ‘नाळ’मधील म्हैस आणि रेडकू यांचा प्रतीकात्मक वापर हा तसाच अगदी पहिल्यापासून सुधाकर यांच्या डोक्यात असल्याचे ते नमूद करतात. तसेच संपूर्ण विषयाला साजेसे एकच गाणे त्यात सामावले जाण्याची शक्यता असल्यामुळे तेवढे एकच गाणे नंतर त्यात घेण्यात आले.

नागराज मंजुळे यांचा या चित्रपटात निर्माता म्हणून सहभाग असला तरी अन्य निर्माते मिळवणे हे काम सुधाकर यांच्यासमोर होतेच. त्या अनुषंगाने सुधाकर सांगतात की, पहिल्यापासून एका मर्यादित खर्चातच हा चित्रपट मला करायचा होता. कारण चित्रपट ही महागडी कला आहे याची मला पुरेपूर जाणीव आहे. या कलेचे अर्थकारण तुम्हाला समजणे गरजेचे असते. अन्यथा तुम्ही केवळ एखादाच चित्रपट करू शकाल, त्यानंतर पुढचा चित्रपट करायला तुमच्याकडे पसे नसतील. सुधाकर यांना उमजलेल्या पक्क्या अर्थकारणामुळेच ‘नाळ’ दोन कोटी रुपयांत पूर्ण झाला आहे. त्याने बॉक्स ऑफिसवरदेखील चांगलेच यश मिळवले आहे.

सिनेमॅटोग्राफर म्हणून सुधाकर यांनी तेलगू, िहदी आणि मराठी या भाषांच्या चित्रपटात काम केले आहे. या तीनही ठिकाणांचा मूलभूत भेद मांडताना ते सांगतात, ‘दाक्षिणात्य तसंच िहदी चित्रपटसृष्टीत कथानक मोठय़ा कलाकारांच्या भोवती फिरते. त्यानुसारच कथेची रचना आणि त्यातील बदल केले जातात. त्या मोठय़ा कलाकारांना महत्त्व असते. िहदीत आता काही प्रमाणात बदल होताना दिसतात. पण मुख्यत: भर हा त्या मोठय़ा कलाकारांवर असतो. अशा वेळी विषय खूपच मर्यादित होऊन जातो. त्या तुलनेत मराठीमध्ये विषयावर अधिक भर असतो. विषय वेगळा असेल आणि विषयालाच प्राधान्य असेल तर कला दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर अशा सर्वच ठिकाणी वेगळे काम करण्यासाठी चांगलाच वाव असतो. अन्यथा पाच गाणी, हिरोचे इंट्रोडक्शन, क्लायमॅक्स असा मामला असेल तर तुम्ही काही वेगळे करू शकत नाही. मराठीत उमेश कुलकर्णी, नागराज मंजुळे यांच्याबरोबर असे विषय मला हाताळता आले. त्यांना काय हवे आहे आणि मी काय करणार याचे एक छान टय़ुिनग येथे जुळून येते. विषयाच्या गरजेनुसार मग प्रयोग करणे शक्य होते.’

सुधाकर यांच्यातील सिनेमॅटोग्राफरमध्ये एक उत्तम दिग्दर्शक दडला आहे. त्या दिग्दर्शकाला व्यक्त होण्याची ‘नाळ’मध्ये अगदी व्यवस्थित संधी मिळाली. एकाच वेळी एकाच कलाकृतीत दोनतीन भूमिका सांभाळणे तसे कठीण काम असते, पण पदार्पणातील पहिल्याच दिग्दíशय प्रयोगातून त्या भूमिका यशस्वी केल्यामुळे भविष्यातदेखील त्यांच्याकडून आणखीन अपेक्षा करायला हरकत नाही.
सौजन्य – लोकप्रभा