श्रावण बाळाची कावड ही पौराणिक कथा सगळ्यांना माहीत असते. कावड धंदा करणारा समाजही अस्तित्वात आहे. कावड धंदा करणारा महादू आणि त्याचे कुटुंब यांचे नाटय़मय जीवनचित्रण करणारा ‘कावड’ हा आगामी मराठी चित्रपट महेश रामदास कचले यांनी दिग्दर्शित केला असून, अभिनेता सुहास पळशीकर या चित्रपटाद्वारे बऱ्याच कालावधीनंतर प्रमुख भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.
आई पद्मावती मुव्ही क्रिएशन या संस्थेची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते प्रमोद मसाळ आहेत. कावड धंदा करणाऱ्या लोकांची कथा आणि व्यथा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक महादूच्या आईची प्रमुख भूमिका साकारणार असून, शांता तांबे, नीलम जाधव, अजय गटलेवार, अशोक सावंत, लक्ष्मण घुले, कैलास झगडे, वृंदा भामरे, खुशी, आर्यन रत्नपारखी आदी कलावंतांच्या यात भूमिका आहेत.