मेक इन इंडिया थीमवर आधारित असलेला बहुचर्चित सुई धागा या चित्रपटाने शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर त्याचं खातं उघडलं. गेल्या अनेक दिवसापासून या चित्रपटाची चर्चा सुरु होती. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार अनुष्का शर्मा, वरुण धवन यांची या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ८.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. नुकतीच ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.

भारतामध्ये पहिल्याच दिवशी २ हजार २०० स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हा चित्रपट ८ ते ९ कोटी रुपयांची कमाई करु शकतो, असा अंदाज चित्रपट समीक्षक अक्षय राठी यांनी वर्तविला होता. तर रोहित जायसवाल यांनी ७ ते ८.५ कोटी रुपये कमाई होईल असं म्हटलं होतं. त्यानुसार हा चित्रपट यशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट येत्या काही दिवसात आणखी कमाई करेल असं दिसून येत आहे.

दरम्यान, या चित्रपटामध्ये मौजी (वरुण धवन) आणि ममता (अनुष्का शर्मा) यांची कथा रंगविण्यात आली आहे. कपडे विणण्याचा एक लहानसा व्यवसाय ते मेक इंडियाला मिळालेली चालना या चित्रपटामध्ये रंगविण्यात आली आहे.