‘सुई धागा – मेड इन इंडिया’ या गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला कमाईचा धागा चांगलाच सापडला आहे. अनुष्का- वरुण धवन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं तीन दिवसांत ३६.६० कोटींची कमाई केली आहे. अर्थात वेगळं कथानक आणि मोठी स्टारकास्ट च्या जोरावर सर्वाधिक प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यात हा चित्रपट यशस्वी झाला आहे.

२ ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्यानं ‘सुई- धागा’ पाहण्यासाठी अधिक प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळतील असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी बांधला आहे. या चित्रपटानं पहिल्या दिवशी ८.३० कोटी, दुसऱ्या दिवशी १२.२५ कोटी तर रविवारी १६.०५ कोटींची कमाई केली आहे.

छोटय़ा गावात राहणारा मौजी (वरुण धवन) आणि त्याची पत्नी ममता (अनुष्का शर्मा) यांची ही कथा आहे. मौजीच्या हातात शिवणकला आहे मात्र त्या कलेवर घर चालू शकत नाही, यावर ठाम विश्वास असलेल्या मौजीच्या वडिलांनी (रघुवीर यादव) आयुष्यभर सरकारी नोकरी केली. आणि निवृत्तीनंतर मौजीनेही कुठेतरी नोकरी करून घरसंसार चालवावा ही त्यांची अपेक्षा आहे. एका शिलाई मशीनच्या दुकानात काम करणाऱ्या मौजीला मालकांची मर्जी सांभाळण्यासाठी जे खेळ करावे लागतात ते पाहून अपमानित झालेली ममता त्याला स्वत:चा काहीतरी उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करते आणि याच संघर्षावर सुई धागा आधारलेला आहे.

शरत कटारिया दिग्दर्शित सुई धागानं पहिल्या तीन दिवसांत ३६.६० कोटींची बक्कळ कमाई केली आहे . आता या चित्रपटाची १०० कोटींच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे.