रेश्मा राईकवार

सुई धागा

देशभरातील छोटी-छोटी शहरे, त्यांची संस्कृती, त्यांच्या गोष्टी दाखवणाऱ्या दिग्दर्शकांची आणि त्यांच्या चित्रपटांची एकच लाट आली आहे. शरत कटारिया दिग्दर्शित सुई धागा हा त्याच लाटेमधील नवीन चित्रपट आहे. शरत कटारियांचा दम लगा के हैशा हा पहिलाच चित्रपट सुखद धक्का देणारा ठरला होता. त्यामुळे त्यांचेच दिग्दर्शन असलेल्या सुई धागा – मेड इन इंडिया या चित्रपटाकडूनही तशीच अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात एका ठरावीक साच्यातून रचलेली गोष्ट आणि ठरलेला गोड शेवट यामुळे एक सुखांतिका यापलीकडे हा चित्रपट फारसा वेगळा अनुभव देत नाही.

छोटय़ा गावात राहणारा मौजी (वरुण धवन) आणि त्याची पत्नी ममता (अनुष्का शर्मा) यांची ही कथा आहे. मौजीच्या हातात शिवणकला आहे मात्र त्या क लेवर घर चालू शकत नाही, यावर ठाम विश्वास असलेल्या मौजीच्या वडिलांनी (रघुवीर यादव) आयुष्यभर सरकारी नोकरी केली. आणि निवृत्तीनंतर मौजीनेही कुठेतरी नोकरी करून घरसंसार चालवावा ही त्यांची अपेक्षा आहे. एका शिलाई मशीनच्या दुकानात काम करणाऱ्या मौजीला मालकांची मर्जी सांभाळण्यासाठी जे खेळ करावे लागतात ते पाहून अपमानित झालेली ममता त्याला स्वत:चा काहीतरी उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करते. मात्र सुरुवातीला सोपी वाटणारी धंद्याची गोष्ट वाटते तितक्या सहजपणे वास्तवात उतरत नाही. त्यात भरीस भर म्हणून नाराज वडील, त्यामुळे सतत जिन्यावरून तरी पडणारी किंवा आजारी पडणारी आई या गोष्टी असतात. शिवाय प्रामाणिकपणे पुढे जाणाऱ्या पण अशिक्षित कोरागिरांना जो अनुभव येतो तोच फसवणुकीचा अनुभव मौजी आणि ममताच्या वाटय़ाला येतो. अनेक संघर्षांनंतर त्यांची ही मेड इन इंडियाची नैय्या अखेर सुखांताकडे पोहोचते. आणि ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड या अर्थाने आपल्यालाही त्यात आनंद मानून घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

संघर्षांनंतर आलेला गोड शेवटाचा टप्पा हा तितकासा रुचणारा नाही. हातात कला असेल तर ती कधी ना कधी जगासमोर येईल, त्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात, हा सकारात्मक विचार असला तरी अगदी शेवटच्या अध्र्या तासात ममता-मौजी        गावक ऱ्यांच्या मदतीने ज्या सहजतेने मेड इन इंडिया मिशन पार पाडतात ते वास्तवापेक्षा रंजक वाटते. रॅम्पवर फॅ शनेबल कपडे घालून वावरणारे गावकरी आणि त्यांच्या वेगळेपणामुळे मिळालेले यश ही गोष्ट प्रत्यक्षात तितकीच सहसजपणे होईल हे सांगता येणे कठीण आहे. त्यामुळे एरव्ही प्रेरणादायी वाटू शकली असती अशी गोष्ट प्रत्यक्षात मौजीच्या भाषेत सब बढिया है, असे सांगण्याचा एक तकलादू प्रयत्न वाटतो. दिग्दर्शक म्हणून गावची संस्कृती अचूक टिपण्याची हातोटी शरत क टारिया यांच्याकडे आहे. ती याही चित्रपटात जाणवते. मात्र मुळात कथा आणि व्यक्तिरेखाच एका साचेबद्ध मांडणीतून आलेल्या असल्याने बाकीच्या गोष्टींचा फारसा प्रभाव पडत नाही. मौजीच्या भूमिकेसाठी वरूण धवनने अथक मेहनत घेतली आहे, मात्र तरीही ही व्यक्तिरेखा प्रभावी ठरत नाही. तर ममताच्या व्यक्तिरेखेत अनुष्का शर्मा योग्य वाटतच नाही. तिने तिच्या परीने अभिनयातून ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी पडद्यावर ती त्या व्यक्तिरेखेत फिट वाटत नाही आणि त्या दोघांची जोडी म्हणून खुलायला दिग्दर्शकाने फारसा वावही ठेवलेला नसल्याने त्याही अर्थाने ही जोडी ठसत नाही. रघुवीर यादव छोटेखानी भूमिकेतही लक्षात राहतात. त्यातल्या त्यात दोन भावांमधला, कुटुंबातला संघर्ष आणि त्यातूनही टिकून राहणारी नाती हा प्रवास दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने मांडला असला तरी सगळेच गोड गोड असणारा हा चित्रपट सुखांतिकेच्या पलीकडे जात नाही.

* दिग्दर्शक – शरत कटारिया

* कलाकार – वरुण धवन, अनुष्का शर्मा, रघुवीर यादव.