छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुजाता कुमार यांचं रविवारी निधन झालं. सुजाता या मेटास्टेटिक कॅन्सरने ग्रस्त होत्या. कर्करोग शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यामुळे सुजाता यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. मात्र सध्या त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ त्यांची अखेरची आठवण असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या सुजाता यांनी तीन महिन्यांपूर्वी TEDx टॉक शो या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थिती दर्शविली होती. या शोमधील त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनातील अनेक अनुभव शेअर केले आहेत.

या व्हिडिओमध्ये आपलं कुटुंब,  कॅन्सरशी दिलेला लढा, अयशस्वी ठरलेलं लग्न आणि या साऱ्यांतून त्यांनी काढलेला मार्ग यावर त्या व्यक्त होताना दिसत आहेत.

दरम्यान, सुजाता यांचं निधन झाल्याची माहिती त्यांची बहिण सुचित्रा कृष्णमुर्ती हिने फेसबुकच्या माध्यमातून सुजाता यांच्या चाहत्यांना दिली. गेली अनेक वर्ष चित्रपसृष्टीत घालविलेल्या सुजाता यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. या व्यतिरिक्त आनंद. एल.राय यांचा ‘रांझना’, करण जोहरचा ‘गोरी तेरे प्यार में’ या चित्रपटामध्येही झळकल्या आहेत. मात्र आजारपणामुळे त्यांनी हळूहळू चित्रपसृष्टीतून काढता पाय घेतला होता.