कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकेत नेहाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सायली परब विवाहबंधनात अडकली आहे. फेसबुकवर ‘Married’ असं स्टेटस लिहून सायलीने चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. यासोबतच तिने लग्नाचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे.

सायलीच्या पतीचं नाव इंद्रनील शेलार असून तो फोटोग्राफर आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सायलीचा साखरपुडा पार पडला होता. १ फेब्रुवारी रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधत आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. चाहत्यांकडून या दोघांवर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Video : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा निरोप घेताना डॉ. अमोल कोल्हे भावूक

सायलीने मालिकांसोबतच नाटक आणि वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ‘सुखाच्या सरींनी..’ या मालिकेआधी ती झी मराठी वाहिनीवरील ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या मालिकेत झळकली होती. त्याचसोबत ‘हुतात्मा’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केलंय.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेमध्ये सायलीसोबतच वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, शर्मिष्ठा राऊत या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर मंदार देवस्थळी यांनी मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.