सौंदर्यस्पर्धेतील महत्त्वाचा मानला जाणारा ‘फेमिना मिस इंडिया २०१९’चा किताब राजस्थानच्या सुमन रावने पटकावला आहे. मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी हा सोहळा पार पडला. या स्पर्धेत उत्तर प्रदेशची शिनता चौहान पहिली रनरअप ठरली तर तेलंगणाची संजना विज दुसरी रनरअप ठरली आहे. या सोहळ्याला हुमा कुरेशी, चित्रांगदा सिंग, रेमो डिसूझा, विकी कौशल व आयुष शर्मा हे सेलिब्रिटी उपस्थित होते. गतवर्षी मिस इंडियाचा किताब जिंकलेल्या अनुकृती वासने सुमनला ‘मिस इंडिया २०१९’चा ताज घातला.

२० वर्षीय सुमनने याच वर्षी ‘मिस इंडिया राजस्थान’ची स्पर्धा जिंकली. ती लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधीत्व करणार असून डिसेंबरमध्ये बँकॉक येथे पार पडणाऱ्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत तिने भाग घेतला आहे. राजस्थानमध्ये जन्मलेली सुमन गेल्या काही वर्षांपासून मुंबईत राहते. चार्टर्ड अकाऊंटचं शिक्षण ती घेत आहे. ‘जेव्हा तुम्ही आयुष्यात एखादं लक्ष्य समोर ठेवता, तेव्हा ते साध्य करण्यासाठी तुमच्या शरीरातील प्रत्येक अणू-रेणू यशाच्या प्रवासाच्या दिशेने काम करत असतो. हा किताब जिंकून मी माझं स्वप्न सत्यात उतरवलं आहे,’ अशी भावना तिने व्यक्त केली.

सुमन मॉडेलिंगसुद्धा करते. त्याचसोबत तिला नृत्यात रस आहे. कथ्थक हा शास्त्रीय नृत्य प्रकार ती सध्या शिकत आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय आहे. विशेष म्हणजे सुमन गेल्या वर्षी मिस इंडियाचा किताब जिंकण्यात असमर्थ ठरली होती. इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये स्वतःची माहिती देताना तिने मिस इंडिया २०१८ची उपविजेती अशी माहिती लिहिली होती.