मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधत आरेतील जंगल व मेट्रो कारशेड संदर्भात मोठी घोषणा केली. “मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करतो, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे,” अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेवर अभिनेता सुमित राघवन याने प्रतिक्रिया दिली. आरेतील मोकळ्या जागेचं आता तुम्ही काय करणार? असा सवाल त्याने मुख्यमंत्र्यांना केला आहे.

“आज मला अमितजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा एक डायलॉग आठवतोय. आज ख़ुश तो बहुत होगे तुम है….. असो आरेतील मोकळ्या जमिनीचं आता तुम्ही काय करणार? हा नवा प्रकल्प आता कधी पुर्ण होणार? या प्रकल्पासाठी अतिरिक्त खर्च किती येईल?” अशा आशयाचं ट्विट सुमितने केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्याने मुख्यमंत्र्यांच्या मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या घोषणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,”मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करणार आहे. आरे कारशेडला माझा विरोध होता. तशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून केली आहे. त्याचबरोबर या जंगलाची व्याप्ती ८०० एकर झाली आहे. त्याचबरोबर आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग येथे करण्यात येणार आहे. कांजूरमार्ग येथे ज्या ठिकाणी कारशेड उभारण्यात येणार आहे, ती जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही. जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही. या कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह मेट्रो कर्मचाऱ्यांचे आभार मानतो,” असं मुख्यमंत्री म्हणाले.