नाशिकमध्ये महाकवी कालिदास कलामंदिरात ‘नॉक नॉक सेलिब्रिटी’ नाटकाच्या प्रयोगादरम्यान एका प्रेक्षकाची मोबाइल रिंग वाजल्याने कलाकार सुमीत राघवन याने प्रयोग थांबवून राग व्यक्त केला. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय होतं हे त्याने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सांगितले. त्याचसोबत आम्ही नाटक अपमान करून घेण्याकरिता करावे का, असा संतप्त सवालही त्याने विचारला आहे.

‘त्या प्रयोगाला वेगवेगळ्या लोकांचा मोबाइल वाजला. त्यात एका गृहस्थाने दरवाजा उघडून आत-बाहेर केलं. तसं करण्याला अजिबात आक्षेप नाही पण ते दार दरवेळी आदळायचं आणि मोठा आवाज व्हायचा. पुढे एक वयस्कर बाई दुसऱ्या बाईला “अहो हळू बोला” असं बोलली. त्यावर‌ ती बाई दाराच्या बाहेर जाऊन बोलू लागली आणि ते बोलणं स्टेजवर एकू येत होतं. शेवटी एका पहिल्या रांगेतील प्रेक्षकाचा फोन वाजला आणि मी चिडून नाटक बंद केलं,’ असं सुमीतने फेसबुकवर लिहिलं.

असाच आणखी एक किस्सा सांगताना त्याने संताप व्यक्त केला. ‘नाशिकमध्येच ‘एक शून्य तीन’ नावाच्या नाटकाचा प्रयोग सुरू होता आणि एका प्रेक्षकाचा फोन वाजला. तो फोनवर बोलू लागला आणि मी आणि स्वानंदी टीकेकर स्टेजवर होतो. मी प्रयोग थांबवून त्या व्यक्तिकडे बघितलं तर त्याने हाताच्या इशाऱ्याने “तुमचं चालू द्या” असं केलं आणि मी स्तब्ध झालो. तिकिट काढलं म्हणजे तुम्ही विकत घेतलं का आम्हाला? का म्हणून करावं‌ आम्ही नाटक? हा अपमान करून घेण्याकरिता? म्हणजे एकीकडे नाट्यगृहांची दुरावस्था आहेच, तशा बकाल नाट्यगृहात काम करा वर आता प्रेक्षकांकडून अप्रत्यक्षरित्या असा अपमान सहन करा.’

सर्वसाधारणपणे प्रयोग सुरू होण्याआधी मोबाईल सायलेंटवर ठेवावा आणि लहान मूल रडायला लागल्यास किंवा प्रयोगात व्यत्यय आणत असल्यास त्याला बाहेर घेऊन जावे, अशी विनंती केली जाते. मात्र नाट्यरसिकांनी हे नियम वारंवार मोडल्याने सुमीतचा राग अनावर झाला.