प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं. त्या ७८ वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय क्षेत्रातूनही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे. अनेक कलाकार आणि नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात, “ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी सामाजिक कार्यकर्ती आणि संवेदनशील दिग्दर्शिका म्हणून केलेले काम या दोन्ही क्षेत्रासाठी यापुढेही मार्गदर्शक ठरेल. समाजातील संवेदनशील विषयावर भाष्य करण्यासाठी त्यांनी चित्रपट या माध्यमाच्या ताकदीचा पुरेपूर वापर केला. आपल्या दिग्दर्शन कौशल्याने त्यांनी सामाजिक प्रश्नांची जाणीव करून देणारा आरसाच समाजासमोर धरला. मनोरंजन क्षेत्राचा हा पैलू उलगडून दाखवून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळी वाटही घालून दिली. उत्तम चित्रपट निर्मिती बरोबरच त्यांनी समाजप्रबोधनातही मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या निधनामुळे या दोन्ही क्षेत्रांना जोडणारा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”

तर खासदार सुप्रिया सुळे, उद्योग आणि खाणकाम मंत्री सुभाष देसाई, धनंजय मुंडे, धीरज देशमुख, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करत सुमित्रा भावे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

तर कलाविश्वातूनही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे. अभिनेता सुबोध भावे, हेमंत ढोमे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर प्रविण तरडे, रवी जाधव यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात, “आत्ताच सुमित्रा भावे ताई यांच्या दु:खद निधनाची बातमी कळली…सुमित्राताई ह्या चित्रपट दिग्दर्शनाचे विद्यापीठ होत्या. त्यांनी हाताळलेला प्रत्येक विषय हा धाडसी आणि सर्वसामान्य माणसांच्या जीवनाशी जगाचा परिचय करून देणारा होता. ‘दोघी’, ‘दहावी फ’, ‘वास्तूपूरूष’, ‘देवराई’, ‘नितळ’, ‘एक कप चा’, ‘घो मला असला हवा’, ‘संहिता’, ‘कासव’, ‘अस्तू’ या सारख्या अप्रतिम चित्रपटांनी भारतीय तसेच जागतिक चित्रपट प्रेमींना मराठी चित्रपटांची आदरयुक्त दखल घ्यायला लावली.आम्हा सर्वांशी त्या अत्यंत आपुलकीने बोलायच्या, आमच्या चित्रपटातील त्यांना आवडणाऱ्या व नावडणाऱ्या गोष्टी सांगून त्या मार्गदर्शन करायच्या. आज त्यांच्या जाण्याने केवळ मराठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमित्राताई भावे यांना भावपूर्ण श्रद्धांजली”

आत्ताच सुमित्रा भावे ताई यांच्या दु:खद निधनाची बातमी कळली…

सुमित्राताई ह्या चित्रपट दिग्दर्शनाचे विद्यापीठ होत्या….

Posted by Ravi Jadhav on Sunday, April 18, 2021

तर अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे सुमित्रा यांचा फोटो शेअर करत म्हणतात, “मी यांना कधी भेटलो नाही, कधी बोलणंसुद्धा झालं नाही…म्हणजे तसा योगच आला नाही.पण ज्या ज्या वेळी यांचा सिनेमा पाहिला, त्या त्या वेळी समृद्ध झालो..खूपच मोठी दिग्दर्शिका..सुमित्रा मावशी!”

मी यांना कधी भेटलो नाही , कधी बोलणं सुध्दा झालं नाही .. म्हणजे तसा कधी योगच आला नाही .. पण ज्या ज्या वेळी यांचा सिनेमा पाहिला त्या त्या वेळी समृध्दं झालो .. खुपच मोठी दिग्दर्शिका .. सुमित्रा मावशी

Posted by Pravin Vitthal Tarde on Sunday, April 18, 2021

आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये अभिनेता भरत जाधव यांनी त्यांचं एक वक्तव्य शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सुमित्रा यांच्या फोटोवरच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात, “जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठीचं एक सशक्त अवजार माझ्या हाती आल्यावर तो घेण्याइतका आनंद चित्रपटाशिवाय दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात मिळाला नसता- सुमित्रा भावे. एक सृजनशील व्यक्ती व दिग्दर्शिका. भावपूर्ण श्रद्धांजली.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)