वाढत्या उन्हाचा चटका तुम्हाला, आम्हाला आणि फिल्मवाल्यानाही… विशेषत: दिवसातले उघड्यावरचे चित्रीकरण म्हणजे, उन टाळू शकत नाही. मग ते स्टुडिओ परिसरातील असो अथवा बाहेरच्या (मुंबईतील वा अगदी मुंबईबाहेरील कुठे कुठे) स्पॉटवरचे असो. सगळीकडे सूर्य सारखाच आग ओकत असतो. त्यातल्या त्यात मोठे स्टार कॅमेर्‍यासमोर येण्यापूर्वी व नंतर व्हॅनिटीत जातात. पण सेटवरच्या तंत्रज्ञ व कामगारांचे काय? बिचारे घाम गाळतात. या माध्यमात दिवसाची बाहेरच्या लोकेशनवरची दृश्ये, गाणी दिवसाच चित्रीत करायला लागतात. ‘इनडोअर’ला हवं तर दिवसातील दृश्ये रात्रौ उशिरापर्यंत चित्रीत करता येतात. तेवढीच बाहेरच्या गरम वातावरणातून सुटका. पण चित्रपटाचे जग फारच सुखासीन आहे असे वाटत असेल तर ते अर्धसत्य आहे. मुंबईतील जवळपास कोणताच स्टुडिओ पूर्णपणे वातानुकूलित नाही हे वास्तव प्रत्यक्ष त्यात वावरल्यावर लक्षात येते. संपूर्ण महाराष्ट्रात एकच चित्रपट स्टुडिओ वातानुकूलित होता, अंधेरी पूर्वचा सेठ स्टुडिओ. तो सुरु झाला, चेतन आनंद दिग्दर्शित ‘कुदरत’ (१९८०)च्या शूटिंगने! पहिल्याच दिवशी राजकुमार व राजेश खन्ना दोघेही उशीराच आले म्हणून असा पूर्ण एसी स्टुडिओ म्हणजे काय हे माहीत झाले आणि जवळपास तो वीस-बावीस वर्षे कार्यरत होता. अन्यथा चित्रपट स्टुडिओत एखादी मेकअप रुम वातानुकूलित. ही दीर्घकालीन परंपरा. पण तरीही उन्हाचे, उष्ण वातावरणाचे चटके सहन करुन पूर्वी दर्जेदार चित्रपट निर्माण झाले. व्हॅनिटी देखिल ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात आली. ती खरं तर बाह्यचित्रीकरण स्थळी स्त्री कलाकारांना कपडे बदलणे व मेकअप यासाठी सुविधा हवी म्हणून पूनम धिल्लानने ती सर्वप्रथम आणली. ती उपयुक्त असल्याचे लक्षात येताच त्यांची संख्या झपाट्याने वाढली. तत्पूर्वीच अमिताभ बच्चनने स्वतःसाठी सर्वसोयीयुक्त अशी मोठीच व्हॅनिटी खास बनवून घेतली. ती बघूनच की काय त्याच आकार व रंगाची व्हॅनिटी दिग्दर्शक मनमोहन देसाईनी बनवून घेतली. दोन्ही व्हॅनिटी एखाद्या स्टुडिओत दिसल्या की लगेच लक्षात येई की, ‘गंगा जमुना सरस्वती’ अथवा ‘तुफान’चे शूटिंग असणार. कधी आमच्या गिरगावात खेतवाडीत व्हॅनिटी दिसली की मनजी घरीच आहेत हे समजे. शक्ती कपूरनेही उन्हाच्या झळांपासून दूर राहण्यासाठी व्हॅनिटी बनवून घेतानाच त्यात त्याने ‘चालता फिरता बार’ बनवला यावर ‘इंडिया टुडे’ने स्पेशल कव्हरेज करताच शक्ती सुखावला नसता तर नवलच होते.

पण व्हॅनिटीचा आणि बूचबंद पाण्याच्या बाटलीचा उगम होण्यापूर्वी उन्हातान्हात कसे बरे शूटिंग्ज झाली असतील? त्या काळात स्टारच्या डोक्यावर रंगीत छत्री घेऊन उभा असलेला मनुष्य हमखास दिसे. आऊटडोअर्स शूटिंगच्या वेळेस तर त्याच छत्रीखाली एखादी तारका असणार हे बघे पटकन ओळखत. पण ते ऊन, उष्णता सहन करीतच ती अभिनय वा नृत्य करतेय याच्याशी त्याना घेणे-देणे नसे.

काळ पुढे सरकला तसे हातातील पंखे जाऊन बॅटरीवर चालणारे आलेले पंखे सेटवर दिसू लागले. मोठ्या चित्रपटांची नेमकी उन्हाळ्यात विदेशातील चित्रीकरणे प्लॅन होऊ लागली. येथेही दिग्दर्शक दिसतो म्हणूया. कुटुंबवत्सल स्टार याच काळात ‘सुट्टी घेऊन कुटुंबासह विदेशवारी’ करु लागला. दैनंदिन मालिकेत काम करणारे असे काहीच करु शकत नाहीत. तरी बरं, मालिका युगातील एकता कपूरचा ओशिवरातील बालाजी स्टुडिओ वातानुकूलित आहे. समोरचाच यशराज स्टुडिओही असाच एसी आहे. अर्थात ही एकविसाव्या शतकातील वाटचाल. पण तत्पूर्वी काय? घामाच्या धारेने मेकअप उतरला तरी अभिनय उंचीवरच राह्यचा. याचे कारण या क्षेत्रात काम करताना उन, पाऊस, थंडी सहन करायला हवीच ही त्या काळातील मानसिकता होती. आताचे कलाकार उन्हाळ्यात आपण भरपूर सॅलड खातो, ताक पितो, शहाळ्याच्या पाण्याला पसंती देतो असे मुलाखतीत सांगतात. तेही काय करणार म्हणा, उन्हात उभे राहून अभिनय कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते. ते शिक्षण वातानुकूलित क्लासमध्ये घेतलेले असते. उन्हाळ्यातील चित्रपटसृष्टीतील घडामोडी या काहीशा अशा. तर पटकथेत उन्हाचा कधी संदर्भ नसला तरी गाण्यात आलाय. ‘गिरफ्तार’ चित्रपटात अमिताभ माधवीला उद्देशून म्हणतो, ‘धूप मे निकला ना करो रुप की रानी…’
दिलीप ठाकूर