|| मानसी जोशी

हिंदी तसेच मराठी मालिकांतून सासू-सुनेचे नाते नेहमीच वाईट रंगवले गेले आहे. मालिकेत कथा रंगवण्यासाठीही सासू-सून त्यांच्यातील कुरघोडी, भांडणे केंद्रस्थानी ठेवून मालिका गुंफली जाते. याच सासू-सुनेच्या नात्याच्या पारंपरिक विचारसरणीला छेद देणारा ‘सून-सासू-सून’ नावाचा गप्पांचा कार्यक्रम ‘स्टार प्रवाह’वर ११ जानेवारीपासून सुरू होत आहे. यानिमित्ताने अभिनेता पुष्कर श्रोत्री सूत्रसंचालकाच्या रूपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाबद्दल तो सांगतो की, सासू-सुनेचे गमतीशीर नाते आहे. तेच नाते या कार्यक्रमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या कार्यक्रमाद्वारे मी महाराष्ट्रातील घराघरांत जाऊन सासू-सुनांशी गप्पा मारणार आहे. विविध प्रश्न तसेच खेळाद्वारे त्यांच्यातील नातेसंबंध उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे.

सासू-सुनेच्या नात्यात त्या दोघींना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे नवरा, त्याच्याशीही हितगुज करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे पुष्करने सांगितले. प्रत्येकाच्या घरात छोटी-मोठी भांडणं, कुरबुरी असतात. हे मतभेद दोन पिढय़ांतील अंतर, वेगळे स्वभाव, परिस्थितीनुसार निर्माण होतात. त्यांना दूर करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाईल, असेही त्याने स्पष्ट केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुष्कर मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक असा राज्याचा दौरा करतो आहे. यानिमित्ताने चित्रीकरणादरम्यान अनेक भावनिक, गमतीशीर अनुभव आल्याचे तो सांगतो. ‘काही वेळेस मी आजारी असताना सासू घरातील जबाबदारी घेते, अशी प्रतिक्रिया सुनांकडून मिळाली. तर लग्नानंतर सुनेपेक्षा आमची दुसरी मुलगीच वाटते, अशा शब्दांत सुनेचे कौडकौतुक करणारी सासूही भेटली, असे त्याने सांगितले.

सासू-सुनेचे गमतीशीर आणि वेगळे नाते आमच्या लेखकाने कवितेतून टिपले आहे. माप ओलांडणारी सून आणि माप काढणारी सासू, नाव घेणारी सून आणि नाव ठेवणारी सासू, अशा शब्दांत पूर्वीच्या नात्याचे वर्णन केले आहे. मात्र कालानुरूप या नात्यात बदल झाला असून, सासूकडून सुनेने अधिकार आणि जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात तर आईच्या अधिकाराने तिच्या कुशीत अलगद निजायचेही असते, असे सुंदर वर्णन यात केले आहे. या कार्यक्रमाचे वेगळे स्वरूप प्रेक्षकांनाही आवडेल अशी आशा पुष्करने व्यक्त केली.

राज्य शासनाचे करोना संदर्भातील सर्व नियम पाळत सध्या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले जाते आहे. विशिष्ट काळानंतर टीमची तसेच माझी करोना चाचणी केली जाते. आम्ही ज्या घरात चित्रीकरण करणार त्या ठिकाणचे र्निजतुकीकरण केले जाते. स्वच्छता ही सुरक्षितता हेच तत्त्व बाळगत आम्ही चित्रीकरण करत आहोत, असेही तो सांगतो. पुष्कर श्रोत्री हे ‘प्लॅनेट मराठी’ या मराठीत येऊ घातलेल्या पहिल्यावहिल्या ओटीटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ‘मार्चपासून करोनाच्या कालावधीत एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. एक कलाकार म्हणून ही बाब मनाला खटकली. त्यामुळे आम्ही ‘प्लॅनेट मराठी’ हे डिजिटल थिएटर सुरू करत असून यावर मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातील. यासाठी प्रेक्षकांना तिकिटे काढून चित्रपट पाहता येतील. ज्या निर्मात्यांना चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करायचे नाहीत, ते चित्रपट या डिजिटल थिएटरवर प्रदर्शित करतील. यासाठी तांत्रिक साहाय्याचे काम सुरू असून डिजिटल थिएटर या महिन्याभरात तर ओटीटी प्लॅटफॉर्म मार्चपर्यंत सुरू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या दोन जबाबदाऱ्यांबरोबरच सध्या काही वेबमालिका आणि लघुपटाचेही दिग्दर्शन करत असल्याचे त्यांनी सांगितले. एक चित्रपट लिहून तयार असून, पुढे चित्रीकरण सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले.