अभिनेता हृतिक रोशन व त्याची बहीण सुनैना रोशन यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरू आहे. सुनैनाच्या प्रेमसंबंधाला रोशन कुटुंबीयांचा विरोध आहे. माझा प्रियकर मुस्लीम असल्याने त्याला दहशतवादी म्हणत कुटुंबीयांनी माझ्यावर हातदेखील उचलला, असे आरोप सुनैनाने केले. या प्रकरणावर अखेर तिच्या प्रियकराने मौन सोडलं आहे. रुहैल आमिन असं सुनैनाच्या प्रियकराचं नाव असून तो पत्रकार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘न्यूज १८’ला दिलेल्या मुलाखतीत रुहैल म्हणाला, ‘हे अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्याच्या धर्मावरून त्याला दहशतवादी ठरवणं चुकीचं आहे. याचा विरोध केला पाहिजे.’ यावेळी रुहैलने सोशल मीडियावरून सुनैनाशी ओळख झाल्याचं सांगितलं. ‘रोशन कुटुंबीयांना आमची मैत्रीसुद्धा नको आहे. त्यांनी तिच्यावर हात उचलला. आमचा संपर्क होऊ नये म्हणून कुटुंबीय तिच्यावर लक्ष ठेवून असतात,’ असंदेखील त्याने पुढे सांगितलं.

सुनैनाबाबत बोलताना तो म्हणाला, ‘सुनैनाला सकारात्मकरित्या तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे. या निर्णयात तिला तिच्या कुटुंबीयांची फक्त साथ हवी आहे. हृतिकनेही सुझान खानशी लग्न केलं होतं. इथेच सगळा विरोधाभास दिसत आहे.’

कुटुंबीयांविरोधात जात सुनैनाने अभिनेत्री कंगना रणौतलाही तिचा पाठिंबा दर्शविला. तिच्याकडे मदतीची मागणीसुद्धा केली. दुसरीकडे सुनैना मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचीही चर्चा आहे. मात्र आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणावर अद्याप रोशन कुटुंबीयांनी काहीच वक्तव्य केलं नाही. हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित ‘रोशन कुटुंबासाठी ही कठीण वेळ आहे’ असं म्हटलं होतं.