‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्याच चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडेंचा आगामी ‘बबन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यातील ‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. विशेष म्हणजे आपल्या जादुई आवाजाने बॉलिवूडला वेड लावणाऱ्या सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोन गायिका पहिल्यांदाच यानिमित्ताने एकत्र गात आहेत.

या गाण्याला ओंकार स्वरूपने संगीतबद्ध केले असून विनायक पवार यांनी हे गाणं लिहिलं. गाण्याची कोरिओग्राफीसुद्धा विशेष लक्ष वेधून घेणारी आहे कारण यामध्ये दाक्षिणात्य, लावणी आणि बेले असा तिहेरी संगम पाहायला मिळतो. गाण्याचे नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर आणि गणेश पतंगे यांनी केलं आहे.

Padmavati Controversy : मोदी सरकारच्या नावाखाली सर्वांचे दुकान चालते- शबाना आझमी

‘बबन’मधील ‘साज ह्यो तुझा’ या पहिल्या गाण्यालाही सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळाला. या गाण्याला चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे आता या दुसऱ्या गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

२९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण यांच्या मुख्य भूमिका आहेत.