बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा फोटो त्याच्या परवानगी शिवाय एका चित्रपटाच्या पोस्टरवर वापरल्यामुळे बालाजी मीडिया फिल्म्स प्रायवेट लिमिटेड नावाच्या कंपनी विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता सुनील शेट्टीने एका मुलाखतीमध्ये ही कंपनी फ्रॉड असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच सुनील शेट्टीने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने, “माझा फोटो एका चित्रपटाच्या पोस्टवर वापरण्यात आला आहे. पण असा कोणताही चित्रपट येणार नाही. हे पोस्टर फेक आहे. युवकांना आमिष दाखवण्यासाठी माझा चेहरा वापरण्यात आला आहे. हे करणारे लोकं बालाजी मीडिया फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करत असल्याचे सांगत आहेत. पण आपल्या सर्वांना माहिती आहे बालाजी कंपनी कोणाची आहे. अप्रत्यक्षपणे ते पैसै उकलण्यासाठी एकता कपूरचे देखील नाव वापरत आहेत. पण त्यांनी बनवलेले पोस्टर पाहून एकता कपूर सुनील शेट्टीसोबत ‘विनीता’ चित्रपट करणार असल्याचे वाटते. हा खूप भयानक फ्रॉड आहे” असे म्हटले.

आणखी वाचा- सुनील शेट्टीने ‘बालाजी मीडिया फिल्म्स’ विरोधात केली तक्रार

पुढे तो म्हणाला, ‘हे लोकं अनेकांना फसवू शकतात. मी माझा मित्र हनिफचे आभार मानेन. त्याने मला काल सांगितले की तुझ्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि ते ऐकून मला आश्चर्य वाटले. या चित्रपटात काम करणे बाजूला राहिले कोणी मला या चित्रपटात काम करणार का? असे देखील विचारले नाही.’

काय आहे प्रकरण?

सुनील शेट्टीने बालाजी मीडिया फिल्म्स प्रायवेट लिमिटेड असे नाव असणाऱ्या एका फ्रॉड कंपनी विरोधात मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये सुनील शेट्टीने त्याच्या परवानगी शिवाय या कंपनीने त्याचा फोटो चित्रपटाच्या पोस्टरसाठी वापरला असून त्याचे नाव सोशल मीडियावर वापरले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच कंपनी सुनील शेट्टीचे नाव घेऊन अनेकांकडून पैसे घेत असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे.