News Flash

तुझी प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी मी शांत राहिलो; सुनीलचा कपिलवर पलटवार

कपिल शर्मा- सुनील ग्रोवरमध्ये ट्विटरवॉर सुरूच

कपिल शर्मा, सुनील ग्रोवर

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील काही संपण्याचे नावच घेत नाही आहे. कपिलच्या जुन्या शोमधून सुरू झालेला हा वाद आता त्याच्याच नव्या शोमुळे आणखीनच चिघळला आहे. ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या नव्या शोमधून कपिल कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, त्याचा जुना साथीदार सुनील या शोमध्ये दिसणार का असा प्रश्न अनेकांनाच सतावत होता. याच पार्श्वभूमीवर, तुला कपिलच्या नव्या शोसाठी विचारणा झाली आहे का, असा प्रश्न एका चाहत्याने सुनीलला सोशल मीडियावर विचारला. यावर सुनीलने दिलेलं उत्तर वाचून कपिलच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली आणि त्याने सुनीलला चांगलेच सुनावले. दोघांमधील हा शाब्दिक वाद सध्या सोशल मीडियावर गाजत असून सुनीलने नुकताच केलेला एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

चाहत्याच्या प्रश्नावर सुनीलने उत्तर दिले होते की, ‘तुझ्याप्रमाणे इतरही काही जण मला हा प्रश्न विचारत आहेत. मात्र मला या शोसाठी कोणताच फोनकॉल आला नाही. माझा नंबर तोच आहे. अखेर बराच वेळ वाट पाहून मी दुसरा शो साइन केला आहे. लवकरच मी तुमच्या भेटीला येणार आहे.’ हेच उत्तर वाचून कपिलचा राग अनावर झाला आणि त्यानेही सुनावले की, ‘मी तुला शंभर वेळा कॉल केला. दोनदा तुझ्या घरी येऊन गेलो. कृपा करून अफवा पसरवू नकोस. यापुढे मी कुणालाही माझा फायदा घेऊ देणार नाही.’

कपिलच्या या ट्विटचे प्रत्युत्तर सुनीलनेही दिले. ‘मी तुझ्या पहिल्या शोमध्ये का परतलो नाही, हे आता लोकांना कळेल. मी तुझ्या नव्या शोबद्दल बोलत होतो आणि तू अजूनही जुने रडगाणे घेऊन बसला आहेस. तुझा असभ्यपणा सर्वांसमोर येऊ नये म्हणून मी वर्षभर शांत राहिलो. कारण तुझी प्रतिमा मलिन होऊ नये. आपण एकत्र खूप चांगले काम केले आहे. तू लक्षपूर्वक वाच, मी नव्या शोबद्दल बोलत होतो. तू एक चांगला कॉमेडियन आहेस, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण लक्षात ठेव, मूत्रपिंड दोन असले तरी यकृत एकच आहे. तुझ्या तब्येतीची काळजी घे. मी पुन्हा स्पष्ट करतो की मला नव्या शोसाठी विचारण्यात आले नाही. नव्या शोसाठी तुला शुभेच्छा,’ असे भलेपोठे पत्र सुनीलने लिहिले.

वर्षभरापूर्वी झालेल्या वादाच्या जखमा अजूनही कपिल आणि सुनीलच्या मनात ताज्या आहेत, हे या शाब्दिक युद्धातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आता कपिल सुनीलला काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2018 5:24 pm

Web Title: sunil grover fires back on kapil sharma comment says i stayed silent for a year so your dignity would stay intact
Next Stories
1 Gudi Padwa 2018: सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उभारली शुभेच्छांची गुढी
2 रंग माझा वेगळा!
3 मराठी ‘बिग बॉस’ महेश मांजरेकर
Just Now!
X