अभिनेता सुनील ग्रोवर सध्या त्याच्या गॅग्स ऑफ फिल्मिस्तान या नव्या शोमुळे चर्चेच आहे. सुनील बऱ्याच वेळा समाजात घडणाऱ्या गोष्टीवर निर्भीडपणे मत व्यक्त करत असतो. त्यामुळे अनेकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोलदेखील व्हावं लागतं. परंतु, ‘अशा ट्रोलर्सकडे मी दुर्लक्ष करतो. मात्र, या ट्रोलिंगमध्ये आई-बहिणींच्या नावाचा उद्धार का होतो?’ असा प्रश्न त्याने विचारल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

“मी काही इतकं वाईट काम केलेलं नाही मग हे लोक ट्रोल का करतात हा प्रश्न मला कायम पडतो. तसंच ४ कौतुक करणारे असतील तर १-२ जण टीका का करतात हे मला कधीच कळत नाही. मात्र मी याकडे दुर्लक्ष करतो. कारण हे सोशल मीडिया आहे आणि इथे असं ट्रोलिंग होतच राहणार. तसंच यात मला फक्त लोकांच्या कमेंट्स पाहायला मिळतात. त्या लोकांना मी वैयक्तिकरित्या ओळखत देखील नसतो. त्यामुळे मी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतो”, असं सुनील म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “माझं ट्रोलिंग केल्यामुळे मला कोणताच फरक पडत नाही. तुम्ही माझ्याविषयी कोणतं मत मांडता याबद्दल मला काहीच वाटत नाही. कारण प्रत्येक जण त्यावर त्यांची मत नोंदवत असतो. तसंच आपण कितीही काही सांगायचा प्रयत्न केला तरी लोकं तुम्हाला खोटंच ठरवणार आहेत. मात्र हे खरंच फार नकारात्मक आहे. अनेक जण फेक अकाऊंटवरुन ट्रोलिंग करतात. मला फक्त इतकंच सांगायचं आहे, जर तुम्हाला माझं काम आवडलं नाही तुम्ही थेट सांगा. पण प्रत्येक वेळी ही गोष्ट सांगताना आई आणि बहिणीच्या नावाचा उद्धार का होतो? त्यांच्यावरुन शिवी का दिली जाते?”

दरम्यान,सध्या सुनील गॅग्स ऑफ फिल्मिस्तानमध्ये दिसून येत आहे. या कार्यक्रमात त्याच्याव्यतिरिक्त उपासना सिंह, सुगंधा मिश्रा, सिद्धार्थ सागर हे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत.