१९९३ साली प्रदर्शित झालेला ‘डर’ हा चित्रपट शाहरुखच्या करिअरमधील सर्वांत महत्त्वाचा चित्रपट ठरला होता. या चित्रपटातील शाहरुखची खलनायकाची भूमिका त्यावेळी प्रचंड गाजली होती. याच चित्रपटादरम्यान सनी देओल व शाहरुख यांच्यात वाद झाले होते. या वादानंतर १६ वर्षांपर्यंत सनी शाहरुखशी बोलत नव्हता. या संपूर्ण प्रकरणावर अखेर सनीने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनीने त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे सविस्तरपणे सांगितलं.

‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत तू शाहरुखशी बोलत का नाहीस असा प्रश्न सनीला  विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, ‘मी स्वत:ला त्या गोष्टींपासून दूरच ठेवत आलो. तसाही मी फार बोलत नाही. आम्ही त्यानंतर कधी भेटलोच नाही तर बोलण्याचा प्रश्नच येत नाही.’ सेटवर तुला शाहरुख व दिग्दर्शक यश चोप्रा घाबरायचे की काय असा गमतीशीर प्रश्न त्याला पुढे विचारण्यात आला. त्यावर ‘कदाचित ते चुकीचे होते म्हणून मला घाबरायचे,’ असं उत्तर सनीने दिलं.

‘डर चित्रपटात शाहरुख माझ्यावर चाकूने हल्ला करतो असं एक दृश्य होतं. या दृश्याबाबत माझी यश चोप्रा यांच्याशी बाचाबाची झाली. मी चित्रपटात कमांडोची भूमिका साकारत आहे तर साहजिकच शारीरिकदृष्ट्या मी फिट असेन. तर एखादा किरकोळ तरुण माझ्यावर सहजासहजी कसा काय हल्ला करू शकणार हे मी यश चोप्रांना समजावण्याचा प्रयत्न करत होतो. माझं लक्ष नसताना त्याने पाठीमागून हल्ला केला तर गोष्ट वेगळी आहे. जर समोरून तो माझ्यावर चाकूने वार करत असेल आणि मी काहीच करत नसेन तर मला तुम्ही कमांडो कसं म्हणू शकता,’ असा प्रश्न सनीने उपस्थित केला.

आणखी वाचा : स्वप्नील जोशीने केला तापसी पन्नूचा ‘गेम ओव्हर’

या प्रसंगादरम्यान सनीचा राग अनावर झाला होता. पण यश चोप्रा यांचा आदर ठेवून त्याने मौन बाळगणं पसंत केलं होतं. ‘स्वत:ला शांत ठेवण्याचा मी प्रयत्न करत होतो. पँटच्या खिशात हात ठेवून मी उभा होतो आणि रागाच्या भरात मी कधी पँटचा खिसा हाताने कुरतडला हेच मला कळलं नाही,’ असं त्याने सांगितलं.

‘डर’ चित्रपटात सनीने जुही चावलाच्या पतीची भूमिका साकारली होती. तर शाहरुखने तिच्या एकतर्फी प्रियकराची भूमिका केली होती. सनी देओलने चित्रपटातील त्याची भूमिका कमी करून शाहरुखची भूमिका वाढविल्याचा आरोपही यश चोप्रा यांच्यावर केला होता. यावर यश चोप्रा यांनी कधीच भाष्य केलं नव्हतं.