अभिनेता विकी कौशलप्रमाणेच त्याचा भाऊ सनी कौशलदेखील बॉलिवूडमध्ये आपलं स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. गोल्ड या चित्रपटामध्ये झळकल्यानंतर सनी लवकरच ‘भंगडा पा ले’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिका साकारत असून तो डबल रोलमध्ये दिसणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटामध्ये सनीसोबत अभिनेत्री रुक्सार ढिल्लन स्क्रीन शेअर करणार आहे.
स्नेहा तौरानी दिग्दर्शित चित्रपटामध्ये सनी जग्गी आणि कप्तान या दोन भूमिका साकारणार आहे. यात तो वडील (कप्तान) आणि मुलगा (जग्गी) या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये वडील आणि मुलगा यांच्यातील वैचारिक मतभेदांवरुन उडणारे खटके पाहायला मिळणार आहेत.
‘या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या आहेत. एकाच दिवशी या दोन्ही भूमिकांसाठीचं चित्रीकरण करणं माझ्यासाठी प्रचंड आव्हानात्मक होतं. मात्र हा अनुभवही छान होता. यातून मला खूप काही शिकायला मिळालं’, असं सनीने सांगितलं.
पुढे तो म्हणतो, ‘या चित्रपटामध्ये मी साकारत असलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा या परस्पर भिन्न आहेत. त्याची विचारशैली वेगळी आहे. जग्गी एक स्वातंत्रसेनानी आहे तर कप्तानचे विचार मात्र सनीपेक्षा वेगळे आहेत. दरम्यान, ‘भंगडा पा ले’ हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनीने यापूर्वी २०१८ मध्ये गोल्ड चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली होती.
First Published on October 9, 2019 4:11 pm