लोकसभेच्या निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. या निवडणुकांच्या प्रचारासाठी बॉलिवूडमधील काही कलाकारांनी पैसे घेऊन प्रचार करणार असल्याचा दावा ‘कोब्रा पोस्ट’ने केला. ३० पेक्षा जास्त कलाकार पैसे घेऊन प्रचार करण्यास तयार असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यासोबतच या वेबसाईटने एक यादी प्रसारित केली आहे. त्यामध्ये सुमारे ३६ कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.कोब्रा पोस्ट’ने केलेल्या दाव्यानंतर अभिनेत्री सनी लिओनी आणि अभिनेता सोनू सूदने याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नाहीये आणि जर कधी मी प्रचार करण्याचं ठरवलं तर सर्वात प्रथम जाहीरपणे सांगेन. इतकंच नाही तर ज्या गोष्टी माझ्या मनाला पटतील, ज्यांच्यात मला सत्यता वाटेल त्याच गोष्टी मी करेन’, असं सनीने ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.

‘आमच्यात जी चर्चा झाली होती, ती चर्चा चुकीच्या पद्धतीने समाजापुढे मांडण्यात आली आहे. या चर्चेमधील काही ठराविक भागच दाखविण्यात आला आहे. त्यासोबतच या घटनेची शहानिशा न करता तिच्यावर चर्चादेखील सुरु झाली आहे. अनेक वेळा मोठे ब्रॅण्ड, राजकीय पक्ष किंवा कार्पोरेट क्षेत्रातील जाहिराती करण्यासाठी कलाकारांना विचारणा करण्यात येते. त्यामुळे कलाकार अशा जाहिरातींसाठी तयारही होतात. मात्र सध्या चुकीच्या पद्धतीने कंटेंट सादर करण्यात आल्यामुळे अनेकांची नाव या यादीमध्ये आली आहेत’, असं सोनूने म्हटलं आहे.

पुढे तो असंही म्हणाला आहे, ‘चर्चा करत असताना कोणत्याही पक्षाला निम्न दर्जा देणार नाही. कोणाचा अपप्रचार होईल असं वागणार नाही. मी सत्याची साथ देईन आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्याचाच प्रचार करेन’.

दरम्यान, कोब्रा पोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा हवाला देत जॅकी श्रॉफ, शक्ती कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू सुद, अमिषा पटेल, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, पुनीत इस्सर, सुरेंद्र पाल, पंकज धीर, निकीतिन धीर, टिस्का चोप्रा, दीपशिखा नागपाल, अखिलेंद्र मिश्रा, रोहित रॉय, राहुल भट्ट, सलीम जैदी, राखी सावंत, अमन वर्मा, हितेन तेजवानी, गौरी प्रधान, सनी लिओनी, कोयना मित्रा, इवलिन शर्मा, पूनम पांडे हे बॉलिवूड सेलिब्रिटी पैसे घेऊन पक्षाचा प्रचार करण्यास तयार झाले आहेत.