काही वर्षांपूर्वी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधून सनी लिओनीने भारतात पदार्पण केलं. त्यानंतर सनीने तिची ‘पॉर्नस्टार’ ही ओळख न लपवता भारतीय चित्रपटसृष्टीतही पाय ठेवला. त्यामुळे अनेक वेळा तिच्या वाट्याला भूमिकाही त्याच स्वरुपाच्या आल्या. या साऱ्यामुळेच खऱ्या आयुष्यातील सनीची ओळख जगापासून लपली गेली आणि ती लोकांसाठी केवळ ‘पॉर्नस्टार’ म्हणूनच राहिली. त्यामुळेच तिचा हा जीवनप्रवास ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’या बायोपिक वेबसिरिजमधून उलगडणार आहे. मात्र त्यापूर्वीच हा बायोपिक वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येत आहे.

काही दिवसापूर्वीच सनीच्या बायोपिकचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या प्रदर्शनापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकत असून पुन्हा एकदा त्याच्या समोर एक नवीन अडचणी उभी ठाकल्याचं दिसून येत आहे. या बायोपिकचं नाव ‘करनजीत कौर-द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ आहे. या नावामध्ये ‘कौर’ हा शब्द वापरण्यात आल्यामुळे त्याच्यावर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) प्रवक्ते दिलजीत सिंह बेदी यांनी आक्षेप नोंदविला आहे.

‘आज तक’च्या माहितीनुसार, सनीने तिचा धर्म बदलला आहे. त्यामुळे तिला या चित्रपटासाठी ‘कौर’ या नावाचा वापर करण्याचा काहीच हक्क नाही. तसंच या बायोपिकमध्ये ‘कौर’ शब्दाचा वापर केल्यामुळे शीख बांधवांच्या भावना दुखाविण्याची शक्यता आहे, त्यामुळे या बायोपिकमधील ‘कौर’ हे नाव हटविण्याची मागणी दिलजीत सिंह बेदी यांनी केली आहे.

दरम्यान, दिलजीत सिंह बेदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर सनीच्या टीमने कोणतेही उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे दिलजीत सिंह बेदी यांच्या वक्तव्यावर सनीच्या टीमकडून काय उत्तर येईल याकडे साऱ्यांचे लक्ष वेधले  आहे. येत्या १६ जुलै रोजी या वेब सीरिजचा पहिला भाग ZEE5 India वर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांचा या वेब सीरिजला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.