बॉलिवुडची अभिनेत्री सनी लिओनीविरोधात शुक्रवारी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे सादर करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सनीने तिच्या संकेतस्थळावर स्वत:ची अश्लील छायाचित्रे टाकली असल्याने लहान मुले तसेच तरुण वर्गामध्ये चुकीचा संदेश जात असल्याचे रणरागिणी शाखेचे म्हणणे आहे. हिंदू जनजागृती समितीने या अश्लीलतेविरोधात आघाडी उघडली आहे. त्याचा भाग म्हणून सनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती तक्रारदार अंजली पालन यांनी दिली. सनी लिओनीचे संकेतस्थळ केवळ प्रौढांनी पाहावे असे म्हटले असले तरी ते सर्व स्तरांतून पाहिले जात आहे. भारतीय युवा पिढीला बिघडवण्याचा प्रयत्न सनी करीत असल्याचा आरोप पालन यांनी केला आहे. महाराष्ट्र, गोवा राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये सनीविरोधात कारवाई करावी म्हणून समितीतर्फे मागणी करण्यात आली आहे.