टीव्ही असो नाहीतर चित्रपट जिथे तिथे बदल घडवून आणण्याचा मक्ता घेतलेल्या एकताबाईंनी सनी लिऑनला अभिनेत्री बनवायचा विडाच उचलला आहे. तिने ‘रागिणी एमएमएस २’ चित्रपटात तिला मुख्य भूमिकाही दिली. आता चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे म्हटल्यावर प्रसिध्दीसाठी एकता सनीला इतक्या कार्यक्रमांमध्ये फिरवते आहे की सध्या सनीशिवाय नाहीच कोणी.. अशी प्रेक्षकांची अवस्था झाली आहे.
सनी लिऑनच्या लोकप्रियतेचा चित्रपटासाठी हरतऱ्हेने पुरेपूर फायदा घ्यायचा चंग एकताने बांधला आहे. त्यामुळे एकीकडे एकता स्वत: सनीला ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’च्या सेटवर घेऊन गेली. कपिलच्या सेटवर सनीने चक्क त्याच्या पत्नीची छोटीशी भूमिका केली. कपिलची बायको म्हणून का होईना सनी डोक्यावर ओढणी घेऊन चक्क लाजली. कपिलचा कार्यक्रम विनोदी असल्याने असा विरोधाभास चाललाही असता. पण, एकताने सनीला आपल्या घरच्या मालिकांमध्येही न्यायचा घाट घातला. आणि मालिका कुठली तर? ‘पवित्र रिश्ता’. सनी एकदम छान साडी नेसून ‘पवित्र रिश्ता’मध्ये अंकिताबरोबरही नाचली.
चित्रपटाच्या नावात सेक्स आणि आशयात हॉरर असल्याने या दोन्ही गोष्टीही प्रसिध्दी कार्यक्रमात असायला हव्यात. चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी सनीचा एक खास व्हिडिओ बनवण्यात आला आहे तोही ‘चित्रपट पाहताना मोबाईल वाजवू नका’ हा संदेश देण्यासाठी. याशिवाय, सनी आणि अभिनेत्री संध्या मृदूल यांचे चित्रपटातील चुंबनदृश्यही सध्या चर्चेचा विषय बनले आहे. आता उरला हॉररचा भाग. त्यासाठी सनी ‘फीअर फाईल्स’ या शोमध्ये सहभागी होणार आहे. भूत-प्रेतात्म्यांची खरी कथा या शोमध्ये दाखवली जाते, असा वाहिनीचा दावा आहे. तर सनी या शोमध्ये ‘रागिणी एमएमएस’चा थरार कसा असेल, याची माहिती देणार आहे. ही सगळी झाली पदद्यावरची भुते.. पण, आपल्या चित्रपटासाठी एकता खऱ्या भुतांनाही सोडणार नाही आहे. भूतपिशाच्चाची बाधा असलेल्या अनेक दंतकथांनी भरलेल्या जागा आपल्या देशात आहेत. तर या जागांवर जाऊन तिथल्या भुतांचीही सनीशी गाठ घालून देण्याची एकताची योजना आहे.