05 June 2020

News Flash

सनीची लावणी, मराठी तारकांचे नृत्य

या सोहळय़ाच्या निमित्ताने मराठी कलाकारांनी क्रूझवर केलेली धम्मालमस्तीही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सनीची लावणी

‘कलर्स मराठी’वर आज सायंकाळी इम्फा सोहळय़ाचे प्रक्षेपण

सनी लिओनीचा ढोलकीच्या तालावरील ठेका, पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक या मराठमोळय़ा अभिनेत्रींसोबत बॉलीवूड अभिनेत्री तनिषा हिची नृत्यमय अदा आणि अतुल परचुरे, श्रेयस तळपदे, सुमित राघवन आदींचे विनोदी सूत्रसंचालन अशा विविध रंगांनी नटलेला ‘इम्फा’ पुरस्कार सोहळा आज, रविवारी सायंकाळी सात वाजल्यापासून कलर्स मराठी वाहिनीवरून प्रक्षेपित केला जाणार आहे. युरोपाच्या समुद्रात ‘नॉर्वेजियन एपिक क्रूझ’वर पार पडलेल्या या पुरस्कार सोहळय़ाच्या निमित्ताने मराठी कलाकारांनी क्रूझवर केलेली धम्मालमस्तीही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

मराठी चित्रपटांच्या वाढत्या जागतिक लोकप्रियतेची साक्ष देत ‘इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल अवॉर्ड’ अर्थात इम्फा सोहळा दरवर्षी भारताबाहेर आयोजित केला जातो. यंदाचा सोहळा बार्सिलोना येथील समुद्रातून सफर करणाऱ्या ‘नॉर्वेजियन एपिक’ क्रूझवर पार पडला. या सोहळय़ामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर अभिनेते सचिन पीळगावकर यांना ‘द रियल हिरो’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सवरेत्कृष्ट अभिनेत्री आणि प्रसिद्ध चेहरा या दोन पुरस्कारांनिशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने या सोहळय़ावर आपली छाप पाडली.

दिलखेचक अदा आणि मादक अभिनय यांमुळे बॉलीवूडमध्ये अल्पावधीत आपली छाप पाडणारी अभिनेत्री सनी लिओनी ही यंदाच्या इम्फा सोहळय़ाचे प्रमुख आकर्षण होते. सनीने तिने अभिनित केलेल्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य केलेच; परंतु ‘मला लागली कुणाची उचकी’,‘वाजले की बारा’ अशा मराठी गाण्यांवर ठेका धरत बहारदार लावणीही सादर केली. नऊवारी साडी आणि मराठमोळा साज चढवून रंगमंचावर उतरलेल्या सनीला उपस्थितांनी शिटय़ा आणि टाळय़ांच्या गजरात दाद दिली. याच सोहळय़ात अभिनेत्री तनिषाने आपली आई तनुजा यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केले, त्यावेळी अवघा माहोल ‘तनुजा’मय होऊन गेला होता. याशिवाय इशा कोप्पीकर हिनेही नृत्य सादर केले.

मराठी तारे-तारकांनीही या सोहळय़ात आपला ठसा उमटवला. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने हिपहॉप नृत्य सादर केले. तर अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांनी स्पेनची ओळख असलेला फ्लॅमिन्को नृत्यप्रकार सादर केला. ‘सेनोरिटा’ गाण्यावर थिरकणाऱ्या या दोघांचा समन्वय, वेशभूषा आणि नृत्य यांनी सोहळय़ाला चारचांद लावले. याशिवाय अवधूत गुप्ते, मानसी नाईक, स्वप्नील बांदोडकर, शरद केळकर यांचेही परफॉर्मन्स उपस्थितांची वाहवा मिळवून गेले.

या सोहळय़ाचे सूत्रसंचालन करणारे श्रेयस तळपदे आणि सुमित राघवन यांनी आपल्या ‘वन लायनर’ विनोदांनी सभागृहात हशा पिकवला. तर अतुल परचूरे आणि मनवा नाईक यांची त्यांना विनोदी साथ लाभली. तेजस्वीनी पंडित आणि संतोष जुवेकर यांनीही सूत्रसंचालनाची अंशत: धुरा सांभाळत प्रेक्षकांना क्रूझची सफर घडवून आणली.

‘कलर्स मराठी’ ने कायम महाराष्ट्राकडे असलेल्या उत्तम आणि दर्जेदार कलाकृतींसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला आहे. इम्फा हे असेच एक व्यासपीठ आहे. क्रूझवर असा सोहळा आयोजित करणे खूप आव्हानात्मक होते. मात्र इम्फासोबत आम्ही हे शिवधनुष्य व्यवस्थित पेलले.

अनुज पोद्दार, कलर्स मराठीचे प्रमुख

इम्फाने मराठी सिनेसृष्टीचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रतिनिधित्व केले आहे. हा केवळ एक सिनेपारितोषक वितरण सोहळा नसून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ आहे. पुढच्या वर्षी आणखी मराठी कलाकारांना या सोहळय़ात सहभागी होण्याची संधी मिळवून देण्यासाठी मुंबईवरूनच क्रूझ रवाना करण्याचा आमचा मानस आहे.

चिदंबर रेगे, इम्फाचे डायरेक्टर 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2015 2:27 am

Web Title: sunny leone performs on lavani imffa 2015
टॅग Sunny Leone
Next Stories
1 शिवाजी महाराजांवर रितेश देशमुखचा चित्रपट
2 ‘लंडनच्या आजीबाई’
3 ‘थर्ड आय’महोत्सवात वहिदा रेहमान यांचा सत्कार
Just Now!
X